बेळगाव : कर्नाटक सरकारने सोमवारी जाहीर केलेल्या अर्थसंकल्पात बेळगावात होणाऱ्या नियोजित रिंगरोडसाठी १४० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी सोमवारी २०२१-२०२२ या आर्थिक वर्षासाठीचा अंदाजे २.४६ लाख कोटी रुपये खर्चाचा अर्थसंकल्प जाहीर केला. त्यात त्यांनी बेळगावच्या पायाभूत सुविधांसाठी निधी दिला आहे. बेळगावच्या नियोजित रिंगरोडसाठी अर्थसंकल्पात त्यांनी १४० कोटी रुपयांची तरतूद केली. या रिंगरोडसाठी उर्वरित ५० टक्के निधी केंद्र सरकार देणार आहे तर धारवाड-कित्तूर-बेळगाव या ७६ कि.मी. अंतराच्या नव्या रेल्वेमार्गासाठी राज्य सरकारतर्फे ४६३ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. विविध विकासकामे आणि कित्तूर किल्ल्यातील पर्यटनाचा विकास करण्यासाठी कित्तूर विकास प्राधिकरणाला ५० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला.
याशिवाय बेळगावमध्ये पाणी चाचणी प्रयोगशाळेची स्थापना, ऑटोमेटेड ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅकचे उद्घाटन, किचन हाैसिंग लर्निंग सेंटर (घर स्वच्छता प्रशिक्षण केंद्र), बेळगावातील प्रादेशिक अन्न सुरक्षा प्रयोगशाळेची सुधारणा आणि बेळगाव महापालिकेच्या खत प्रकल्पाचा विकास यासाठीदेखील अर्थसंकल्पामध्ये निधीची तरतूद केली आहे.
उत्तर कर्नाटकमध्ये स्मार्ट हॅण्डलूम डिझाईन स्टुडिओ उभारण्यासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे.