कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात ९७ हजार ८०० मतदारांची माहिती आणि छायाचित्रे समान आहेत, कोल्हापूर उत्तर मतदार संघात असे १४ हजार मतदार आहेत. ज्यांची दोन मतदार संघात नावे आहेत. एकाच मतदार संघात दुबार नोंदणी होत नाही, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. या मतदारसंघात ३,२८७ नवमतदारांची नोंद झाली असून, एकही केंद्र संवेदनशील नाही तरीही, पोटनिवडणुकीसाठी जिल्हा व पोलीस प्रशासन सज्ज असल्याचे त्यांनी सांगितले.कोल्हापूर उत्तर विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशपांडे हे दोन दिवसीय कोल्हापूर दौऱ्यावर आले आहेत. दरम्यान, त्यांनी मतदान यंत्र ठेवण्याची जागा व मतमोजणी केंद्राची पाहणी केली. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार उपस्थित होते.श्रीकांत देशपांडे म्हणाले, ज्यांच्या माहितीमध्ये व छायाचित्रांमध्ये समानता आहे, अशा व्यक्तींची विभागीय अधिकाऱ्यांकडून प्रत्यक्ष भेट देऊन शहानिशा केली जात आहे. कोल्हापूर उत्तरच्या पोटनिवडणुकीसाठी जिल्हा व पोलीस प्रशासन सज्ज असून, सर्व राजकीय पक्षांनी आचारसंहितेचे पालन करणे गरजेचे आहे. गुन्हा नोंद असलेल्या व्यक्तीला उमेदवारी दिली असेल तर ती का दिली, याची माहिती पक्षांनी आपल्या वेबसाईटवर दिली पाहिजे. उमेदवांनी स्वत: तीनवेळा आपली माहिती वृत्तपत्रात प्रसिद्ध केली पाहिजे. ८० वर्षांपेक्षा जास्त व दिव्यांग व्यक्तींना पोस्टल मतदानासाठी मागणी करता येईल. जिल्ह्यात अशा दिव्यांग मतदारांची संख्या ४२७ इतकी आहे.
राज्यात २३ लाख नावे वगळली...वेगवेगळ्या मतदार संघात एकच माहिती व छायाचित्र व्यक्ती तीच असल्याचे लक्षात आल्यावर एका मतदार संघातून नाव वगळले जाते. अशारीतीने राज्यात आजवर २३ लाख नावे वगळण्यात आली आहेत, आणखी आठ लाख व्यक्तींची शहानिशा करणे बाकी आहे. ज्यांची छायाचित्रे समान आहेत असे ४० लाख मतदार आहेत. दोन लाख मतदारांच्या तपासणीत ६० टक्के प्रकरणात व्यक्ती एकच असल्याचे दिसून आले आहे.११ लाख वाढले...निवडणूक आयोगाच्या वतीने राबविण्यात आलेल्या मतदार पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत राज्यात २३ लाख मतदार वाढले, तर १२ लाख जणांची नावे वगळण्यात आली. एकूण ११ लाख मतदारांची नव्याने नोंद झाली आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात ५३ हजार २९९ तर कोल्हापूर उत्तरमध्ये ३,२८७ नवमतदारांची नोंद झाली आहे.सगळं मतदारांनीच करायचे व्हय...श्रीकांत देशपांडे म्हणाले, मतदार संघात पक्षाकडून आमिषे दाखविली जात असतील, मोठ्या संख्येने जेवणावळी व मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जात असेल किंवा समाज माध्यमांवर बदनामीकारक आक्षेपार्ह मजकूर प्रसारित केला जात असेल तर मतदारांनीच त्याची तक्रार जिल्हा प्रशासनाकडे करावी. ऑडिओ-व्हिडीओ क्लीपदेखील ऑनलाईन ॲपवर सादर केल्यास निवडणूक आयोगाच्या वतीने कारवाई केली जाते. तक्रारदाराचे नाव गुप्त ठेवले जाईल.