समीर देशपांडे ।कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचे नियोजन आणि त्यानुसार जिल्ह्यातील शिक्षकांनी केलेले प्रामाणिक प्रयत्न यामुळे यंदाही खासगी शाळांमधून २३४८ विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये प्रवेश घेतला आहे. यामध्ये इंग्रजी माध्यमातील १४३९ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
गेले काही महिने शिक्षकांच्या बदल्यांमुळे एकीकडे शिक्षण विभाग चर्चेत आला आहे. बदल्यांसाठी शिक्षकांची गेले सहा महिने जिल्हा परिषदेत सुरू असलेली वर्दळ, शिक्षक नेत्यांची मध्यस्थी आणि याचा काही मोजक्या लोकांनी उठवलेला फायदा यामुळे हा विभाग चर्चेत आला आहे; परंतु बहुतांशी शिक्षकांनी आपल्या कामाला प्राधान्य दिल्याने जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांनी उठावदार काम करून दाखविले आहे. खासगी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळा जे उपक्रम राबवितात, तसेच उपक्रम आता जिल्हा परिषदेच्या शाळांमध्येही राबविले जात असल्याने, अनेक पालकांनी आपल्या मुलांना या शाळांमध्ये घालण्याचा निर्णय घेतला आहे.
गुढी पाडवा, पट वाढवा, पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी पदाधिकारी, अधिकाऱ्यांनी गावागावांत जाणे, इस्त्रोला भेट यांसह अनेक उपक्रमांमुळे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचे काम पालकांपर्यंत पोहोचले आहे. शिष्यवृत्ती परीक्षेत तर राज्यात सर्वाधिक विद्यार्थी कोल्हापूर जिल्ह्यातील आले आहेत. या सगळ्यांचा परिणाम म्हणजे जिल्हा परिषदेच्या शाळांना पालक प्राधान्य देत आहेत.
एकूणच शिक्षण पद्धतीमध्ये मातृभाषेतून शिक्षण देण्याचे महत्त्व ही पटत चालल्याने पालकही पाल्यांना मराठी माध्यमातून शिक्षण देण्यासाठी अनुकूल होत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. परिणामी इंग्रजी माध्यमातून १४३९ विद्यार्थी आणि खाजगी शाळांमधून ९0९ असे एकूण २३४८ विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये प्रवेश घेतला आहे.
विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास डोळ्यांसमोर ठेवून जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग कार्यरत आहे. आमच्याकडे उच्चविद्याविभूषित, गुणवान शिक्षक आहेत. विविध नवउपक्रमांच्या माध्यमातून आम्हीही विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील आहोत. गणवेश, पुस्तके, पोषण आहार पुरवठा या शासनाच्या योजनाही यासाठी पूरक ठरल्या आहेत.- आशा उबाळे, प्राथमिक शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद कोल्हापूर
जिल्ह्यातील सर्व शाळा गेल्या अडीच वर्षांमध्ये आम्ही डिजिटल केल्या. त्यासाठी महागडे सॉफ्टवेअरही आणले. ह्यमाझी शाळा, समृद्ध शाळाह्ण या स्पर्धेमुळे एक विधायक वातावरण तयार झाले. शिक्षकांनी परिश्रम करत शिष्यवृत्तीमध्ये महाराष्ट्रात जिल्हा परिषदेचा झेंडा फडकविला. यामुळे पालक मुलांना जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये घालत आहेत.- अंबरीश घाटगे, शिक्षण सभापती, जिल्हा परिषद