राजाराम लोंढे ।कोल्हापूर : कोल्हापूर विभागातील साखर कारखान्यांनी गेल्या हंगामातील ‘एफआरपी’प्रमाणे संपूर्ण रक्कम देत १४५ कोटी ४२ लाख रुपये अधिक वाटप केले आहेत. राज्याची ९८ कोटी थकीत एफआरपी असताना विभागातील ‘माणगंगा’, ‘केन अॅग्रो’ वगळता सर्व कारखान्यांनी ‘एफआरपी’ सोडून अधिक पैसे दिले आहेत.
गेल्या हंगामातील थकीत ‘एफआरपी’चा प्रश्न सध्या राज्यासह संपूर्ण देशात चर्चेत आला आहे. महाराष्टÑात ९८ कोटी, तर उत्तर प्रदेशमध्ये सुमारे ११०० कोटी ‘एफआरपी’ थकीत आहे; त्यामुळे या हंगामातील उचलीबरोबरच गत हंगामातील थकीत ‘एफआरपी’चा मुद्दा प्रकर्षाने पुढे येत आहे. गेल्या हंगामात शेतकरी संघटनांबरोबर झालेल्या तडजोडीत ‘एफआरपी अधिक दोनशे’ रुपयांवर तडजोड झाली.
हंगामाच्या सुरुवातीला घाऊक बाजारात साखरेचा दर ३५०० रुपये प्रतिक्विंटल असल्याने कारखानदारही तडजोडीला राजी झाले; पण त्यानंतर साखरेच्या दरात घसरण सुरू झाली ती २१०० रुपयांपर्यंत आली.काही कारखान्यांनी पहिल्या महिन्याचे तडजोडीच्या फार्म्युल्याप्रमाणे पैसे दिले; पण बॅँकांकडून उचल कमी झाल्याने दोन टप्पे केले. राज्य व केंद्र सरकारने मदत केली; पण ‘एफआरपी’ देताना साखर कारखान्यांची दमछाक उडाली. हंगाम संपला तरी राज्यातील बहुतांशी कारखान्यांनँ ‘एफआरपी’प्रमाणे पैसे देता आले नाहीत; पण ‘एफआरपी’ देण्यात कोल्हापूर विभाग फारच पुढे राहिला.
कोल्हापूर विभाग वगळता उर्वरित महाराष्टतील कारखान्यांकडे ९८ कोटींची थकीत एफआरपी आहे. कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील कारखान्यांना गेल्या हंगामात पाच हजार ७८५ कोटी ५२ लाख ६६ हजार रुपये देय ‘एफआरपी’ होती. प्रत्यक्षात कारखान्यांनी पाच हजार ९३० कोटी ९४ लाख ३५ हजार रुपये दिलेले आहेत. ‘माणगंगा’ची सात कोटी ५८ लाख, तर केन अॅग्रो (डोंगराई) ची ९५ लाख एफआरपी अद्याप थकीत आहे.‘आजरा’, ‘शिंदे’ आघाडीवर!आजरा कारखान्यांची २४४०, तर मोहनराव शिंदेंची २४४१ रुपये एफआरपी होती. त्यांनी दराच्या स्पर्धेमुळे अनुक्रमे ३००० व ३००६ रुपये शेतकऱ्यांना पैसे दिले; त्यामुळे एफआरपी आणि प्रत्यक्ष दिलेला दर यामध्ये अनुक्रमे ५६० व २६५ रुपये, तर ‘बिद्री’ने सर्वाधिक ३१०० रुपये दर दिला आहे, त्यांची २८६८ रुपये एफआरपी होती.