कोल्हापूर : चैन करण्यासाठी दुचाकी चोरून विकणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने शिताफीने अटक केली. त्याच्याकडून पाच लाख रुपये किमतीच्या १५ दुचाकी जप्त करण्यात आल्या. अवधूत लहू धुरे (वय २०, रा. फये, ता. भुदरगड) व तुळशीदास अर्जुन पाटील (२१, रा. भेंडवडे) अशी संशयितांची नावे आहेत. त्यातील तुळशीदास हा बी.एस्सी.चा विद्यार्थी असून धुरेने चोरलेल्या दुचाकी विक्रीचे तो काम करत होता.जिल्ह्यात दुचाकी चोरीचे प्रमाण वाढत असल्याने पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाला याबाबत तपास करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांनी पथक नेमले होते. पोलीस नाईक तुकाराम राजिगरे यांना खबऱ्याकडून समजलेल्या माहितीच्या आधारे चोरीच्या दुचाकी विक्रीसाठी येणाऱ्या दोघांना पकडण्यासाठी कळंबा परिसरात सापळा रचला होता.सोमवारी (दि.२६)ला संशयित अवधूत धुरे व तुळशीदास पाटील हे दोघे विना नंबरच्या दुचाकीवरून आले. तेव्हा सहायक पोलीस निरीक्षक संतोष पवार, सत्यराज घुले, पांडुरंग पाटील, तुकाराम राजिगरे, विठ्ठल मणिकेरी यांनी संशयितांना अटक केली. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत शहर व उपनगरांत घरासमोर व पार्किंगमध्ये उभ्या केलेल्या दुचाकी चोरल्याची कबुली दिली.
लॉकडाऊन काळात त्यांनी जुना राजवाडा, शाहूपुरी, राजारामपुरी, भुदरगड व करवीर पोलीस ठाण्यांच्या हद्दीत १५ दुचाकी चोरल्याचे सांगितले. या दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या आहेत.बालगुन्हेगार ते सराईतअवधूत धुरे हा बालगुन्हेगार म्हणून सुधारगृहात होता. तीन वर्षांपूर्वी तेथून तो चांगल्या चोरीची सवय लागल्याने आता तो सराईत म्हणून पोलीस रेकॉर्डवर आला आहे. त्याचे कुटुंबीयही त्याला वैतागले असल्याने तो स्वतंत्र राहत असल्याची माहिती पुढे आली आहे.