कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीतून सोमवारी संतोष बिसुरे व अस्लम सय्यद या दोन अपक्ष उमेदवारांनी माघार घेतली. त्यामुळे निवडणुकीच्या रिंगणात आता १५ जणांनी शड्डू ठोकला आहे. मुख्य लढत मात्र काँग्रेसच्या जयश्री जाधव व भाजपचे सत्यजित कदम यांच्यामध्येच होणार आहे. मतदान १२ एप्रिलला व मतमोजणी १६ एप्रिलला होणार आहे.
काँग्रेसचे दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेसाठी ही निवडणूक होत आहे. सोमवारी दुपारी ३ वाजेपर्यंत माघारीची मुदत होती. या वेळेत संतोष गणपती बिसुरे व अस्लम बादशहा सय्यद या दोन अपक्ष उमेदवारांनी माघार घेतली.
त्यामुळे आता रिंगणात जयश्री जाधव (इंडियन नॅशनल काँग्रेस), सत्यजित कदम (भारतीय जनता पक्ष), यशवंत कृष्णा शेळके (नॅशनल सोशालिस्ट पार्टी), विजय श्यामराव केसरकर (लोकराज्य जनता पार्टी), शाहिद शहाजान शेख (वंचित बहुजन आघाडी), सुभाष वैजू देसाई, बाजीराव सदाशिव नाईक, भारत संभाजी भोसले, मनीषा मनोहर कारंडे, अरविंद भिवा माने, मुस्ताक अजीज मुल्ला, करुणा धनंजय मुंडे, राजेश उर्फ बळवंत सत्याप्पा नाईक, राजेश सदाशिव कांबळे, संजय भिकाजी मागाडे (सर्व अपक्ष) हे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. दुपारनंतर मुख्य निवडणूक अधिकारी राजू स्वामी यांनी उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला.
कर्मचाऱ्यांचे आज प्रशिक्षणमतदान व मतमोजणी प्रक्रियेत सहभागी असणाऱ्या कर्मचाऱ्यांना आज मंगळवारी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. विवेकानंद महाविद्यालयाच्या बापूजी साळुंखे सभागृहात सकाळी ९ वाजल्यापासून हे प्रशिक्षण सुरू होईल. या पोटनिवडणुकीसाठी महसूलच्या २२०० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.मतदानाच्या दिवशी सार्वजनिक सुट्टीकोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीत मतदारांना मतदान करता यावे, यासाठी १२ एप्रिलला सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. ही सुट्टी मतदारसंघाच्या क्षेत्रातील जे मतदार कामासाठी त्या त्या मतदारसंघांच्या बाहेर असतील, त्यांना तसेच केंद्र शासनाची शासकीय कार्यालये, निमशासकीय कार्यालये, सार्वजनिक उपक्रम, बँकांना लागू असेल, असे सामान्य प्रशासन विभागाचे उपसचिव यांनी जाहीर केले आहे.