* थकबाकीत असणारे २१७०० ग्राहक
* आजरा तालुक्याची स्थिती
सदाशिव मोरे / लोकमत न्यूज नेटवर्क
आजरा : वीज वितरणचे आजरा तालुक्यात ३८७७४ विविध प्रकारचे ग्राहक असून, त्यांपैकी २१७०० ग्राहक थकबाकीत आहेत; तर गेले आठ महिने बिल न भरणारे ६८५७ ग्राहक असून त्यांच्याकडे दोन कोटी ७१ लाखांची थकबाकी आहे. तालुक्यातील सर्व ग्राहकांकडून येणेबाकी १५ कोटी २६ लाखांची असून गावोगावी अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून ग्राहकांना भेटून वसुलीची मोहीम सुरू आहे. कोरोना संकटाच्या काळात वीजबिलाची वसुली झाली नाही; पण वीजपुरवठा अखंडित सुरू ठेवण्यात आला. शासनाकडून थकीत असणारे वीजबिल माफ होणार म्हणून अनेक ग्राहकांनी थकीत वीज बिल भरलेले नाही. मात्र, शासनाने वीज बिल माफ करण्याऐवजी थकबाकीची रक्कम १२ समान हप्त्यांत वसूल करावी, असे आदेश दिले आहेत. मात्र, थकबाकी आहे म्हणून वीज कनेक्शन तोडणार नसल्याचेही जाहीर केले आहे. गेली आठ ते नऊ महिने वीज बिल वसुली थांबल्याने आजरा तालुक्यात थकबाकीचा आकडा १५ कोटी २६ लाखांवर पोहोचला आहे. एप्रिलपासून वीज वितरणला बिलापोटी एक रुपयाही न देणारे ६८५७ ग्राहक असून त्यांच्याकडे दोन कोटी ७१ लाखांची थकबाकी आहे. थकबाकी वसुलीसाठी वीज वितरणचे अधिकारी व कर्मचारी सकाळी सात ते रात्री १० पर्यंत गावोगावी ग्राहकांच्या भेटी घेऊन बिल भरण्याबद्दल प्रबोधन करीत आहेत. वीज बिल भरण्यासाठी फक्त १० टक्के ग्राहकांनी प्रतिसाद दिला आहे. अजूनही शासनाकडून वीज बिल माफ होणार, या अपेक्षेवर अनेक ग्राहक आहेत.
तालुक्यात घरगुतीची १०५० फॉल्टी मीटर असून या ग्राहकांना सरासरी बिल देण्यात आले आहे. सरासरी बिल भरण्यास ग्राहकांनी नकार दिला असून वीज वितरणकडे फॉल्टी मीटर बदलण्यासाठी नवीन मीटर नाहीत. वसुली थांबल्यामुळे नवीन मीटरची खरेदी झालेली नाही.
-------------------------------------------------------------------------------------------
(टीप : बातमीसाठी आवश्यक असलेला थकबाकी रकमेचा तक्ता ‘क्यूएक्सडी’ फाईल करून सोबत वेगळा पाठवला आहे.)