लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कसबा बावड्याच्या विकासास प्राधान्य देण्यात येणार असून, कसबा बावडा परिसरातील नागरिक येत्या महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेच्या पाठीशी राहतील आणि शिवसेना पुन्हा कसबा बावड्याचा गड जिंकेल, असा विश्वास राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी सोमवारी (दि. २६) येथे व्यक्त केला.
क्षीरसागर यांच्या विशेष प्रयत्नांतून महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सोयीसुविधांच्या विकासकामाकरिता मंजूर झालेल्या १५ कोटींच्या निधीतून विकासकामांचा प्रारंभ झाला. कसबा बावडा येथील पार्वती मेडिकल ते शाहू सर्कलकडे जाणारा रस्ता पेव्हर पद्धतीने डांबरीकरणाच्या कामास ११ लाख आणि गंगा भाग्योदय हॉल, कसबा बावडालगतच रस्ता डांबरीकरणाच्या कामास पाच लाख निधी मंजूर करण्यात आला आहे.
क्षीरसागर म्हणाले, कसबा बावडावासीयांच्या मनात शिवसेनेने स्थान निर्माण केले आहे. कसबा बावडा आणि शिवसेनेचे अतूट नाते आहे. कसबा बावड्याच्या विकासास नेहमीच प्राधान्य दिले आहे. राजाराम बंधाऱ्याच्या पर्यायी पुलाकरिता १७ कोटी निधी मंजूर केला आहे. राजाराम बंधारा ते कसबा बावडा रोडकरिता रु. २५ लाख, यासह बावड्यातील प्रमुख मार्ग आणि अंतर्गत कॉलनी, गल्ल्यांमधील रस्त्याची कामे, पाणंद यांचा विकास आदी कामांसाठी आजतागायत दोन कोटींच्या वर निधी वितरित केला आहे. कसबा बावडा स्मशानभूमीची सुधारणा, विविध ठिकाणी ओपन जिम, खेळणी, हायमास्ट लॅम्प, आदी विकासकामे करण्यात आली आहेत. पुढील काळातही नियोजित कामांद्वारे कसबा बावड्याचा सर्वांगीण विकास करू.
क्षीरसागर यांची राज्य नियोजन मंडळाच्या कार्यकारी अध्यक्षपदावर पुनर्नियुक्ती झाल्याबद्दल कसबा बावडा विभागातील पदाधिकारी आणि शिवसैनिकांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी संजय लाड, दिनकर उलपे, शिवसेना उपशहरप्रमुख सुनील जाधव, रवी माने, भीमराव बिरंजे, राजू काझी, उत्तम रंगपुरे, विद्यानंद थोरवत, राहुल माळी, अक्षय खोत, राकेश चव्हाण, सचिन पाटील, दयानंद गुरव आदी शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
२७०४२०२१-कोल-राजेश क्षीरसागर
कोल्हापुरात कसबा बावडा परिसरातील विविध विकासकामांचा प्रारंभ सोमवारी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. यावेळी बावडा परिसरातील मान्यवर कार्यकर्ते उपस्थित होते.