कोल्हापूर : कृषी यांत्रिकीकरण योजनेत निधी तरतुदीसाठीचा शासन आदेश आल्याने सरकारी अनुदानावर शेती सुलभ करणारी यंत्रे घेऊ इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांचा जीव भांड्यात पडला आहे. याअंतर्गत जिल्ह्याला दीड कोटीचा निधी मंजूर झाला आहे. तब्बल सहा महिन्यांहून अधिक काळाच्या प्रतीक्षेनंतर निधी आल्याने आता नोंदणीचा वेग वाढणार आहे.
या वर्षी पाऊसमान चांगले राहिल्याने शेतीतील कामांची बारमाही सुगी सुरू आहे; पण मजुरांची टंचाई जाणवत असल्याने कृषी अवजारे घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. त्यातही मिनी ट्रॅक्टर, पॉवर टिलर, औषध फवारणी, कोळपणी, कापणी, भांगलण मशीन, पंप, मनुष्य व बैलचलित अवजारे, प्रक्रिया युनिट्स यांची मागणी वाढली आहे. ही अवजारे ४० ते ५० टक्के सवलतीवर दिली जात असल्याने तर ती खरेदी करण्यावर शेतकऱ्यांचा भर दिसत आहे.
या योजनेची नोंदणी महाडीबीटी पाेर्टलअंतर्गत पूर्णपणे ऑनलाईन करण्यात आली आहे. राज्यभरातील शेतकरी एकाच वेळी यावर मागणी नोंद करू शकतात. यावर्षी हे पोर्टल सुरू झाले, नाेंदणीही सुरू झाली; पण यावर्षी कोरोनामुळे वर्ष संपत आले तरी निधीची तरतूदच झाली नसल्याने या योजनेचे भवितव्य टांगणीला लागले होते. अखेर वर्ष संपण्यास १५ दिवस उरले असताना राज्यभरासाठी ६७ कोटी ६२ लाखांचा निधी शासनाने कृषी विभागाकडे वर्ग केला आहे. यात कोल्हापूरच्या वाट्याला दीड कोटी रुपये आले आहेत. गेल्या सात वर्षांत या योजनेअंतर्गत ४२४० शेतकऱ्यांनी लाभ घेतला असून ट्रॅक्टर, पॉवर टिलरसह विविध कृषी अवजारे खरेदी करून शेतीतील कष्ट कमी करण्याचा प्रयत्न केला आहे.
चौकट ०१
असे असते अनुदान
मागासवर्गीय, अल्पभूधारक, महिला या गटासाठी ५० टक्के अनुदान आहे, तर इतर लाभार्थ्यांसाठी ४० टक्के अनुदान या यंत्राच्या खरेदीवर दिले जाते.
चौकट ०२
अशी असते प्रक्रिया
ही अवजारे घेऊ इच्छिणाऱ्यांना सर्वप्रथम राज्य सरकारच्या महाडीबीटी या पोर्टलवर नोंदणी करावी लागते. यानंतर प्रस्तावांची छाननी होते. ऑनलाईनच सोडत काढली जाते. यंत्र खरेदी केल्याची संबंधित यंत्रणेकडून तपासणी होते, खरेदीची पावती जमा झाली की कृषी विभागाचा अहवाल आल्यानंतर प्रत्यक्ष अनुदान जमा होते.
चौकट ०३
यांत्रिकीकरण योजनेची प्रगती
वर्ष दिलेली यंत्रे
२०१३-१४ ४३५
२०१४-१५ ३९५
२०१५-१६ ५९८
२०१६ -१७ ३५९
२०१७ - १८ १०२५
२०१८-१९ ४२८
२०१९-२० १०००
एकूण ४२४०