इचलकरंजी : दुहेरी मोक्क्यातील गुंड संजय तेलनाडे याने माझ्यावर खोटे गुन्हे दाखल करून अडकविण्यासाठी महिलांना १५ कोटी रुपयांचे आमिष दाखवले, असा मुद्दा आमदार प्रकाश आवाडे यांनी विधानसभेमध्ये लक्षवेधी सूचनेद्वारे उपस्थित केला. आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेमार्फत चौकशी करण्याचे आश्वासन उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिले.महापालिकेतील भ्रष्टाचारासंदर्भात आवाडे यांनी लक्षवेधी सादर केली होती. या लक्षवेधीवर बोलताना ते म्हणाले, भ्रष्टाचाराच्या प्रकरणामागे मी लागलो आहे, असे कळाल्यानंतर मला अडकविण्यासाठी त्या गुंडाने महिलांना १५ कोटी रुपयांचे आमिष दाखवले. माझ्यावर खोटी फिर्याद करा, काही तरी आरोप करा आणि अडकवा, अशा सूचना देण्यात आल्या. जर तुम्हाला शिक्षा झालीच, तर तीन ते चार महिने होईल. त्यानंतर तुम्ही सुटाल. मात्र, तुम्हाला १५ कोटी रुपये मिळतील, असे त्या महिलांना सांगून माझ्यावर गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न करण्यात आला. यासंदर्भातील माहिती लेखी स्वरुपात मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना संबंधित महिलेचे पत्र आणि माझे पत्र जोडून दिले आहे. या दोघांवर कारवाई करण्याची मी विनंती करीत आहे. सर्वसामान्य गोरगरिबांचे प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही या सभागृहात येत आहोत. सन १९८५ सालापासून मी या सभागृहाचा सदस्य आहे. तीनवेळा राज्यमंत्री व एक वेळा मंत्रिपद भूषवले आहे. माझ्या त्रागावरून हे प्रकरण किती गंभीर आहे, हे आपल्या लक्षात येईल. आर्थिक गुन्हे शाखा अथवा ईडी यंत्रणेमार्फत याची चौकशी व्हावी.मंत्री सामंत म्हणाले, आवाडे यांनी सांगितलेली बाब गंभीर आहे. त्यांनी जी नावे घेतली आहेत, त्यांच्यावर पूर्वीही गुन्हे दाखल आहेत. कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही. त्यांच्यावर आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेमार्फत चौकशी केली जाईल.
मला अडकविण्यासाठी महिलांना १५ कोटींचे आमिष, आमदार प्रकाश आवाडेंचा गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: August 03, 2023 5:02 PM