आॅनलाईन लोकमत
कोल्हापूर, दि. 0३ : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांच्यासह पंधरा संचालक सोमवारी बॅँकींग व्यवसाय अभ्यास दौऱ्यासाठी दुबई, मॉरिशेस साठी कोल्हापूरातून रवाना झाले. सात दिवसांचा हा दौरा असून मंगळवारी पहाटे तीन वाजता ते दुबईकडे उड्डाण करणार आहेत.
सहा वर्षाच्या प्रशासकीय कालावधीनंतर २०१५ मध्ये जिल्हा बॅँकेवर सभासद नियुक्त संचालक मंडळ कार्यरत झाले. संचालक मंडळ जरी आले तरी बॅँक आर्थिक अरिष्टातच होती. त्यामुळे बॅँकेतील जुन्या रूढी व परंपरा बाजूला ठेवून अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांनी काम करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाला संचालकांनी चांगली साथ दिल्याने बँकेची प्रगती गतीने झाली.
सनई-चौघडा व ढोल ताशांच्या गजरात संचालकांनी बड्या धेंड्याकडून कर्ज वसुली केल्याने बॅँकेचा संचित तोटा जाऊन नफ्यात आली. यासाठी संचालकांचे योगदान मोठे असल्याने अध्यक्ष मुश्रीफ यांनी स्वखर्चाने संचालकांना विदेश सहलीचे आयोजन केले आहे.
दुबई, मॉरिशेस सह त्या शेजारील देशांचा ते अभ्यास दौरा करणार करणार असून त्यासाठी सोमवारी सकाळीच ते कोल्हापूरातून मुंबईकडे रवाना झाले. मुंबईतून मंगळवारी पहाटे तीन वाजता विमानाने ते दुबईला जाणार आहेत. तेथून ते मॉरिशेसला जाणार असून तेथे ते बॅँकींग हाऊस मध्ये बॅँकींग व्यवसायाबाबत माहिती घेणार असून त्यानंतर पुर्णपणे निसर्गावर अवलंबून असणाऱ्या ऊस शेती व साखर उद्योगाचीही ते माहिती घेणार आहेत. ११ जूलै रोजी ते परत येणार आहेत.
या दौऱ्यात अध्यक्ष हसन मुश्रीफ यांच्यासह के. पी. पाटील, अशोक चराटी, राजू आवळे, बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, भैय्या माने, सर्जेराव पाटील-पेरीडकर, संजय मंडलिक, संतोष पाटील,राजेंद्र पाटील-यड्रावकर, विलास गाताडे, अनिल पाटील, असिफ फरास, निवेदिता माने, उदयानी साळुंखे असे पंधरा संचालक गेले आहेत.
ए. वाय. पाटील यांच्या वडीलांचे निधन झाल्याने ते जाऊ शकले नाहीत. उपाध्यक्ष अप्पी पाटील यांच्या साखर कारखान्याची कामे असल्याने त्यांनीही दौऱ्याकडे पाठ फिरवली. विनय कोरे, पी. एन. पाटील, महादेवराव महाडिक यांनी दौऱ्यावर जाण्यास नकार दिल्याचे समजते. तर पी. जी. शिंदे व स्विकृत संचालक आर. के. पोवार यांच्या पासपोर्ट नुतनीकरण न झाल्याने ते जाऊ शकले नाहीत.