कोल्हापूर : पंधरा आॅक्टोबरला कोल्हापुरात निघणाऱ्या ‘न भूतो, न भविष्यती’ अशा मराठा क्रांती महामोर्चात सहकुटुंब सहभागी होण्यासाठी कोल्हापूर महानगरपालिकेचे कायम व रोजंदारी मिळून सुमारे सहा हजार कर्मचारी सामुदायिक रजेवर जाणार आहेत. प्रत्यक्ष जरी रजा घेतली जाणार असली तरी मोर्चावेळी मात्र स्वयंसेवक म्हणूनच ते काम करणार आहेत, तसेच सर्व नगरसेवक, पदाधिकारीही सहकुटुंब मोर्चात सहभागी होणार आहेत. महापौर अश्विनी रामाणे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी महापालिकेतील विठ्ठल रामजी शिंदे चौकात हा मेळावा पार पडला, त्यामध्ये हा निर्धार करण्यात आला. मेळाव्यास नगरसेवक, पदाधिकारी,अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कोल्हापुरातील मराठा क्रांती महामोर्चा यशस्वी करण्यासाठी मनपाच्या अधिकाऱ्यांनी तसेच कर्मचाऱ्यांनी प्रयत्न करावेत, नगरसेवक, पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या त्यांच्या प्रभागात जनजागृती मेळावे घेऊन जास्तीत जास्त नागरिकांना मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन करावे, असे आवाहन महापौर रामाणे यांनी केले. नगरसेवक, कर्मचाऱ्यांनी घराला कुलूप लावून महामोर्चात सहभागी होण्याचे आवाहन स्थायी सभापती मुरलीधर जाधव यांनी केले तर कर्मचारी संघाचे अध्यक्ष विजय वणकुद्रे यांनी १५ आॅक्टोबरला महानगरपालिकेचे सर्व कर्मचारी, अधिकारी एक दिवस सामूदायिक रजेवर जातील आणि मोर्चात सहभागी होतील, असे जाहीर केले. मोर्चाच्या दिवशी सकाळी साडेनऊ वाजता महापालिकेत कर्मचाऱ्यांनी जमावे, असे आवाहनही त्यांनी केले. शहाण्णव कुळी मराठा असणे ही आमची चूक नाही. मराठा समाजाला प्रत्येक हक्कात आरक्षण दिले पाहिजे, अशी मागणी रूपाराणी निकम यांनी यावेळी केली. समाजातील मोठा भाऊ म्हणून मराठा समाजाने आतापर्यंत सर्वांना न्याय देण्याची भूमिका बजावली, परंतु आता याच समाजावर अन्याय होऊ लागला आहे. शिक्षणाच्या क्षेत्रात, शेती उद्योगात हा अन्याय होत आहे. म्हणूनच मराठा समाज हक्कासाठी लढतोय. त्यांना आरक्षण दिलेच पाहिजे, अशी मागणी सूरमंजिरी लाटकर यांनी केली. याप्रसंगी अशोक जाधव, अनुराधा खेडेकर, विजय सूर्यवंशी, किरण नकाते, नियाज खान, निशिकांत सरनाईक यांची भाषणे झाली. यावेळी उपमहापौर शमा मुल्ला, परिवहन सभापती लाला भोसले, महिला बालकल्याण सभापती वृषाली कदम, शिक्षण समिती सभापती अजिंक्य चव्हाण, गटनेते शारंगधर देशमुख, सत्यजित कदम यांच्यासह अनेक नगरसेवक, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)अग्निशमन, रुग्णवाहिका पुरविणारमहामोर्चातील सहभागी लोकांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्याकरीता महानगरपालिकेची यंत्रणा मंगळवापासून सतर्क झाली. आयुक्त पी. शिवशंकर यांच्या उपस्थितीत काही प्रमुख नगरसेवक, वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन करावयाच्या नियोजनासंबंधी सूचना केल्या. आयुक्तांनी मोर्चा पार पडेपर्यंत व त्यानंतर करावयाच्या उपाययोजना राबविण्याकरीता दोन अधिकाऱ्यांची समन्वयक म्हणून नियुक्ती केली. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर, उपायुक्त ज्ञानेश्वर ढेरे, विजय खोराटे, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, लेखापाल संजय सरनाईक, मुख्य आरोग्य निरीक्षक विजय पाटील, नगरसेवक प्रा. जयंत पाटील, शारंगधर देशमुख, प्रवीण केसरकर, राहुल माने, प्रताप जाधव, इंद्रजित बोंद्रे आदी उपस्थित होते.
मनपा कर्मचाऱ्यांची १५ ला सामुदायिक रजा
By admin | Published: October 05, 2016 1:00 AM