शिरोली : मादळे येथे पंधरा गव्यांचा कळप सायंकाळी सहाच्या सुमारास मादळे गावालगत रामचंद्र कोरवी यांच्या बंगल्याच्या खालील बाजूस रिकाम्या ठिकाणी फिरत असताना अमोल पोवार, सोयल राजूभई, बाळासो कोपार्डे, प्रतीक पाटील यांना दिसून आला. गवे मनपाडळे गावाच्या बाजूला खाली उतारावरती फिरत असल्याने मादळे गावच्या मुख्य रस्त्यावरून ते स्पष्टपणे दिसून येत होते. ही बातमी अनेकांना समजल्याने स्थानिक नागरिक व प्रवाशांनी गव्यांना बघण्यासाठी गर्दी केली होती. याआधी चारच्या सुमारास हा कळप पोवार मळा शिवाराजवळ जंगलात स्थानिक गुराख्यांना दिसून आला होता. तोच कळप पुढे जात कोरवी यांच्या बंगल्याच्या खालील बाजूस उत्तरेला आला. या कळपात जवळपास दहा गवे पूर्ण वाढ झालेले व लहान चार ते पाच पिल्लू असल्याचे प्रत्यक्षदर्शनी पाहिलेल्या लोकांनी सांगितले. येथून पुढे हा कळप मनपाडळे गावाच्या दिशेने खाली जंगलात जाताना दिसून आला.गुरुवारी सायंकाळी गव्यांचा कळप कोपार्डे यांच्या शेतामध्ये घुसून ज्वारी पिकात घुसून, खात असताना शेतकऱ्यांनी हुसकावून लावला होता. परंतु, गवे पुन्हा पुन्हा शिवारात घुसून धुडगूस घालत असल्याने शेतकरी स्थानिक नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
कोल्हापुरातील सादळे मादळे परिसरात १५ गव्यांचा कळप
By ऑनलाइन लोकमत | Published: December 02, 2023 12:31 PM