लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : ताराराणी चौक परिसरातील एका हॉटेलमध्ये मध्य प्रदेशमधील दोघा भामट्यांनी घड्याळ खरेदीचा बहाणा करीत सुमारे पंधरा लाख रुपये किमतीची रॅडो कंपनीची पंधरा घड्याळे हातोहात लंपास करीत पोबारा केला. रेल्वे फाटक, राजारामपुरी रोडवरील दुकान मालकाला गंडा घालणाºया भामट्यांची नावे निष्पन्न झाली आहेत. संशयित विक्रम शर्मा व अजय शंकरलाल (दोघे रा. मध्य प्रदेश) अशी त्यांची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी, राजन सोनी (रा. बेळगाव) यांचे रेल्वे फाटक, राजारामपुरी रोडवर घड्याळाचे दुकान आहे. याठिकाणी इम्तिहाज मोमीन हे व्यवस्थापक म्हणून काम करतात. सोनी यांच्या घड्याळ शॉपीची वेबसाईट असल्याने त्यावरील फोन नंबरवरून विक्रम शर्मा याने चार दिवसांपूर्वी दुकानातील मार्केटिंग एक्झिक्युटीव्ह गौतम कामकर यांच्याशी संपर्क साधला. आमच्या कंपनीचा इव्हेंट आहे, त्याठिकाणी बक्षिसे देण्यासाठी घड्याळे हवी आहेत. त्यावर कामकर याने दुकानात या, तुम्हाला विविध प्रकारची किमती घड्याळे बघायला मिळतील, असे सांगितले; परंतु शर्मा याने आम्ही हॉटेलमध्ये येईन त्यावेळी तुमच्याशी संपर्क साधला की, तुम्ही घड्याळे घेऊन या, त्याठिकाणी आपण खरेदी करू, असे सांगितले.
दरम्यान, शर्मा याने ताराराणी चौक परिसरातील एका हॉटेल व्यवस्थापकाशी संपर्क साधला. त्यांच्याकडे अॅटॅच रुमची मागणी केली. रुम उपलब्ध नसल्याने त्याने त्यादिवशी कोल्हापूरला येण्याचा बेत रद्द केला. रुम शनिवारी उपलब्ध असल्याने तो साथीदार अजय शंकरलाल याच्यासोबत सकाळी हॉटेलवर आला. पंधरा हजार रुपये भरून त्याने रुम नंबर ७१९-२० ताब्यात घेतली. त्यानंतर अकराच्या सुमारास फोन करून गौतमला बोलावून घेतले. ८० हजार ते २ लाख रुपये किमतीची पंधरा घड्याळे घेऊन गौतम व धनंजय पाटील हॉटेलवर आले. येथील रिसेप्शन रुममध्ये ते बसले. थोड्या वेळाने शर्मा खाली आला. मिस्टर गौतम का? म्हणून त्याने विचारणा केली.
ओळख झाल्यानंतर तो रुमनंबर ७२० मध्ये घेऊन गेला.याठिकाणी दोघांना बसवून आतील रुममध्ये बॉस आहेत, त्यांना घड्याळे दाखवून आणतो म्हणून घड्याळांचा ट्रे आतमध्ये घेऊन गेला. त्यानंतर बाहेर येऊन हॉटेलमधील वेटरला फोन करून पकोडे व कॉफीची आॅर्डर केली. तीन-चारवेळा आतबाहेर केल्यानंतर तो पुन्हा आतमध्ये गेला. इतक्यात वेटर कॉफी घेऊन आला. शर्मा याने बॉससाठी ज्युस सांगितला होता. तो व त्याचा बॉस आतमध्ये पंधरा मिनिटे बसून राहिल्याने गौतम याने उठून रुमचा दरवाजा उघडला असता रुममध्ये कोणीही नव्हते. घड्याळांचा ट्रे रिकामाच पडला होता. त्याने सहकारी पाटील याला ते रुममध्ये नसल्याचे सांगितले. त्यांनी आतमध्ये आजूबाजूला पाहिले असता रुमच्या पाठीमागील दरवाजाने दोघेजण निघून गेल्याचे दिसून आले.
हा प्रकार पाहून ते भांबावून गेले. पाटील हा धावतच रिसेप्शनजवळ आला.त्याने शर्माची चौकशी केली असता फोनवर बोलत तो धावत बाहेर गेल्याचे सांगितले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी व्यवस्थापक मोमीन व मालक सोनी यांना या प्रकाराची माहिती दिली. त्यांनी तत्का\ळ पोलिसांत फिर्याद देण्यास सांगितले. याप्रकरणी अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक संतोष पवार करीत आहेत.चोरटे सीसीटीव्हीतपोलिसांनी रुमची झडती घेतली असता एक नवी रिकामी बॅग मिळून आली. रिसेप्शन रजिस्टरमध्ये या दोघांची नावे व मध्य प्रदेशमधील त्यांचा पत्ता मिळून आला. हॉटेलच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोघेही कॅमेराबद्ध झाले आहेत. साधारणत: तीस ते पस्तीसच्या वयोगटातील आहेत.दोघेही मराठी, हिंंदी व इंग्रजी चांगल्या प्रकारे बोलत होते. त्यांचा पेहराव हाय-फाय होता. ते सावळ्या रंगाचे व तब्बेतीने बारीक आहेत. हॉटेलमधून बाहेर पडून ते ताराराणी चौकाच्या दिशेने गेल्याचे दिसून आले आहे. सीसीटीव्हीमध्ये दोघांचे चेहरे स्पष्ट दिसत आहेत. दोघेही सराईत चोरटे असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. त्यांचा तिसरा साथीदार बाहेर पाळत ठेवून असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.