कोल्हापूर : रयतेचा राजा राजर्षी शाहू महाराज यांच्या कागलवाडी, कसबा बावडा येथील जन्मस्थळाचे ऐतिहासिक संग्रहालय करण्याकरिता १५.६० कोटींच्या आराखड्यास मंजुरी देण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. छत्रपती शाहू महाराज यांच्या कागलवाडी येथील जन्मस्थळ असणाऱ्या लक्ष्मी विलास पॅलेस येथे भेट देऊन फडणवीस यांनी शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले. याप्रसंगी ते बोलत होते. छत्रपती शाहू महाराजांचे कार्य खूप मोठे असून, त्यांनी रयतेच्या उद्धारासाठी जे कार्य केले, त्याचे जतन व्हावे व त्यापासून आपल्या सर्वांना प्रेरणा मिळावी, यासाठी जन्मस्थळाची ऐतिहासिक संग्रहालय म्हणून जोपासना होणे गरजेचे आहे. समाज विकास व समाजाच्या मार्गदर्शनासाठी छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांचा वारसा जोपासणे गरजेचे आहे. त्यामुळे सर्वांना प्रेरणास्थान ठरणाऱ्या या संग्रहालयासाठी निधी कमी पडू देणार नाही. याकरिता जो सुधारित आराखडा शासनाला सादर केला होता, त्याप्रमाणे १५ कोटी ६० लाख इतका निधी मंजूर केला आहे. यापुढेही या ऐतिहासिक स्थळाला निधीची कमतरता पडू देणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी बोलताना दिली. यावेळी शिक्षणमंत्री विनोद तावडे, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, खासदार संभाजीराजे छत्रपती, खासदार संजयकाका पाटील, आमदार अमल महाडिक, आमदार सतेज पाटील, शाहू कारखान्याचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे, ‘गोकुळ’चे संचालक बाबा देसाई, शाहू जन्मस्थळ समितीचे सदस्य डॉ. वसंतराव मोरे, आदी मान्यवर उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी ग्रामस्थांना सोडा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी दुपारी दोन वाजता छत्रपती शाहू महाराजांचे जन्मस्थळ असणाऱ्या कागलवाडी येथील लक्ष्मी विलास पॅलेसला भेट दिली. यावेळी पॅलेसच्या बाहेर त्यांचे स्वागत करण्यासाठी कसबा बावड्यातील नागरिक उभे होते. यादरम्यान मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी आमदार सतेज पाटीलही तेथे आले. आत आल्यानंतर आमदार सतेज पाटील यांनी आधीच स्वागतासाठी उभे असलेले शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडे ‘आमच्या ग्रामस्थांना मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी तरी आत सोडा’, अशी विनंती केली. त्यावर तावडे यांनी आमदार सतेज पाटील यांच्याकडे पाहत, ‘आम्हाला काय समजते. तुमच्याकडून शिकायला लागलो आहे’, असा हसतहसत टोला हाणला.
शाहू महाराज जन्मस्थळ संग्रहालयासाठी १५ कोटी
By admin | Published: June 27, 2016 1:10 AM