कोल्हापूर : गेले पंधरा दिवस हळूहळू वाढणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या रविवारी दिलासादायक ठरली. दिवसभरात अवघे १५ नवे कोरोना रुग्ण आढळले, तर एकाही कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला नाही. सध्या २९३ रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांत कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याचे चित्र आहे; पण गेल्या चोवीस तासांत रविवारी फक्त १५ नवे रुग्ण आढळले. त्यामध्ये शहरातील नव्या ५ रुग्णांचा समावेश आहे. त्याशिवाय करवीर तालुक्यातील नवे ३ रुग्ण, हातकणंगले, आजरा या दोन तालुक्यांत प्रत्येकी एका रुग्णाची भर पडली. दिवसभरात सुमारे २८ रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देऊन घरी पाठविले. सध्या कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या ५० हजार ८७४ वर पोहोचली आहे, तर कोरोनाबाधित मृत्यूची संख्या १७५० पर्यंत पोहोचली आहे. आतापर्यंत ४८ हजार ८३१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे सध्या विविध रुग्णालयांत २९३ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
नव्या कोरोनाग्रस्तांची संख्या चोवीस तासांत कमी असली तरी नागरिकांनी मास्क, सॅनिटायझरचा वापर नियमित ठेवावा, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, गर्दी करू नये, अशा सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.