राम मगदूमगडहिंग्लज : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या निवडणुकीत गडहिंग्लज नगरपालिकेच्या सत्ताधारी जनता दलाच्या १५ नगरसेवकांनी पालकमंत्री सतेज पाटील यांच्या पाठीशी राहण्याचा निर्णय घेतला आहे. आज, बुधवारी दुपारी १ वाजता पाठिंब्याची घोषणा पत्रकार परिषदेत होणार आहे.सोमवारी (१५ नोव्हेंबर) पालकमंत्री पाटील यांनी जनता दलाचे जेष्ठ नेते माजी आमदार अॅड.श्रीपतराव शिंदे यांच्या निवासस्थानी नगराध्यक्षा प्रा.स्वाती कोरी व जनता दलाच्या १५ नगरसेवकांची भेट घेतली होती. त्यावेळी गडहिंग्लज शहराच्या विकासासाठी पाठबळ दिल्यास आपण पाठिंबा देऊ, असे आश्वासन नगराध्यक्षा प्रा. कोरी यांनी दिले होते.दरम्यान, मंगळवारी (२३ नोव्हेंबर) अॅड.शिंदे, खासदार प्रा. संजय मंडलिक, मुरगुडचे नगराध्यक्षा राजेखान जमादार यांच्या उपस्थितीत झालेल्या जनता दल नगरसेवकांच्या बैठकीत पालकमंत्र्यांच्या पाठिंब्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. त्याची अधिकृत घोषणा पालकमंत्री पाटील यांच्या उपस्थितीत आज, दुपारी होईल.निर्णायक मते मिळाली 'एक गठ्ठा' !गेल्यावेळच्या चुरशीच्या सामन्यासह यापूर्वी झालेल्या तीनही विधानपरिषदेच्या निवडणुकीत तीनही निवडणुकीत जनता दलाने माजी आमदार, उद्योगपती महादेवराव महाडिक यांना पाठींबा दिला होता. परंतु, यावेळी पालकमंत्री पाटील यांना पाठिंबा देण्याचा निर्णय जनता दलाने घेतला आहे. त्यामुळे यंदाच्या चुरशीच्या निवडणुकीत निर्णायक १५ मतांमुळे पालकमंत्र्यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाला आहे.महाडीक यांनीही मागितला होता हात? पण..माजी खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी भाजपचे उमेदवार अमल महाडिक यांच्यासाठी जनता दल नगरसेवकांच्या पाठिंब्यासाठी गडहिंग्लजच्या फेऱ्या केल्या होत्या. परंतु, गडहिंग्लज शहराच्या विकासासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार पालकमंत्री पाटील यांना पाठिंबा देण्याचा निर्णय यावेळी जनता दलाने घेतला आहे.
गडहिंग्लज नगरपालिकेतील जनता दलाचे नगरसेवक पालकमंत्र्यांच्या पाठिशी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2021 11:40 AM