कोल्हापूर : अधिक परताव्याचे आमिष दाखवून कोल्हापूरसह सांगली, सातारा, सोलापूर, लातूर, उस्मानाबाद येथील सुमारे १५ हजार गुंतवणूकदारांची ५६ कोटी ४४ लाख ५२ हजार ८३१ रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी मेकर ग्रुप इंडिया कंपनीच्या अध्यक्ष, कार्यकारी संचालकासह १६ जणांच्या कार्यकारी मंडळावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला.शाहूपुरी चौथी गल्ली येथे मेकर ग्रुप इंडिया कंपनीचे कार्यालय आहे. या कंपनीचे अध्यक्ष रमेश वळसे-पाटील, कार्यकारी संचालक मनोहर अंबुलकर आणि १६ जणांच्या कार्यकारी मंडळाने अधिक परताव्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांचे कंपनीमध्ये ठेवींच्या स्वरूपात पैसे भरून घेतले. कोल्हापूरसह सांगली, सातारा, सोलापूर, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यात कार्यालये सुरू करून एजंटांद्वारे गुंतवणूकदारांकडून त्यांनी पैसे घेतले. सुमारे १५ हजार लोकांनी या कंपनीत मासिक, वार्षिक हप्ते, रिकरिंग डिपॉझिट, फिक्स्ड डिपॉझिट व वेगवेगळ्या योजनांद्वारे आर्थिक गुंतवणूक केली. मुदत संपल्यानंतर ठेवी अधिक परताव्याने परत करण्यास टाळाटाळ करू लागले. आपली फसवणूक झाल्याचे समजताच गुंतवणूकदार संजय केरबा दुर्गे (वय ४०, रा. पट्टणकोडोली, ता. हातकणंगल) यांनी पोलिसांत फिर्याद दिली.संशयित नावे अशीकंपनीचे अध्यक्ष रमेश महादेव वळसे-पाटील (५५, रा. आकुर्डी, पुणे), कार्यकारी संचालक मनोहर अंबुलकर (५२, रा. वसई), कार्यकारी मंडळ ज्ञानदेव बाळासो कुरुंदवाडे (५२, रा. चावरे, ता. हातकणंगले), पुरुषोत्तम माधव हसबनीस (३६, रा. आरचीज रेसिडेन्सी, इंगळेनगर, कोल्हापूर), बी. बी. लिमकर (६०), श्रीधर खेडेकर (५५), संतोष कोठावले (४५), दादा पडलकर (५८), बीजीएस आराध्ये (४५), भास्कर नाईक (४५), एन. पी. खरजे (४८), चंद्रशेखर आराध्ये (५५), मीना राठोड (३५), माधव गायकवाड (४५), कमलाप्पा (४२), मनीषा ससर (४०), श्रीराम डवरे (५८), गौतम माने (४८) अशी त्यांची नावे आहेत.
१५ हजार गुंतवणूकदारांना ५६ कोटींचा गंडा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 09, 2018 4:26 AM