लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : वितरकांकडून वाढलेला पुरवठा व गोव्याला पाठविण्यात येणाऱ्या १० टन ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाल्याने रोज जवळपास १५ टन ऑक्सिजन शिल्लक राहत आहे. यामुळे आता जिल्हा प्रशासनाची चिंता मिटली आहे.
जिल्ह्यात महिन्याभरात अचानक कोरोना रुग्ण वाढल्याने ऑक्सिजनची मागणीदेखील वाढली आहे. मात्र त्या प्रमाणात पुरवठा होत असल्याने जिल्हा प्रशासनच ऑक्सिजनवर होते. मिळणाऱ्या ऑक्सिजनमध्येच कसाबसा दिवस पार पडायचा. ऑक्सीजनचा तुटवडा पडू नये म्हणून स्वत: जिल्हाधिकारी, अप्पर जिल्हाधिकारी यांच्यासह महसूलमधील अधिकारी ऑक्सिजन निर्मिती करणाऱ्या कंपनीत ठाण मांडून बसायचे. त्यामुळे अडचणीचा कालावधीदेखील जिल्हा प्रशासनाने निभावून नेला.
गेल्या काही दिवसांत मुंबई व पुण्यातील रुग्ण झपाट्याने कमी झाले आहेत. तेथील ऑक्सिजनची मागणी कमी झाल्याने कोल्हापुरमधील तीन वितरकांना ऑक्सिजनचा जादा पुरवठा हाेत आहे. कोल्हापूर ऑक्सिजनकडून गोव्याला रोज १० टन ऑक्सिजन पाठवला जात होता, तो गेल्या चार दिवसांत बंद झाल्याने त्यांच्याकडील १० टन व अन्य वितरकांकडील चार ते पाच टन असा जवळपास १५ टन म्हणजे एक दिवस पुरेल एवढा साठा शिल्लक राहत आहे.
---
ऑक्सिजनची रोजची गरज : ५० ते ५३ टन
पुरवठा : ६२ ते ६५ टन
शिल्लक : १० ते १५ टन
---