कोल्हापूर : आजरा तालुक्यातील उचंगी लघु पाटबंधारे प्रकल्पातील ज्यांची शेती धरणाच्या एका बाजूला व गाव दुसरीकडे आहे अशा चाफवडे येथील १५० कुटुंबाना पुर्नमुल्यांकन करून घरांचा मोबदला देण्याचा निर्णय सोमवारी येथे झालेल्या प्रकल्प आढावा बैठकीत झाला.
जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी बैठकीतूनच कृष्णाखोरे महामंडळाचे कार्यकारी संचालक रजपूत यांच्याशी व्हीसीद्वारे चर्चा केली व घरांचा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले. या लोकांना घरांचा मोबदला मिळालेलाच नाही. कारण ही घरे बुडित क्षेत्रात येत नाहीत परंतू त्यांची शेती एकाबाजूला व दुसरीकडे घरे येतात व मध्ये धरण येत असल्याने त्यांची कुचंबणा होते. त्यामुळे त्यांच्यासाठी काय करता येईल अशा विविध पर्यायांवर यापूर्वी विचार केल्यानंतर घरांचे पुर्नवसन करण्यात येणार आहे. खासबाब त्यास मंजूरी देवू असे जलसंपदा मंत्री पाटील यांनी स्पष्ट केले.प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न १५ जूनपर्यंत मार्गी लावावेत, त्यांना योग्य मोबदला द्यावा, या प्रकल्पातील आक्षेपार्ह जमिनी व अडचणीबाबत अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष त्या ठिकाणी जावून पर्यायी योग्य तो मार्ग काढावा असेही मंत्री पाटील यांनी बजावले. जिल्हाधिकारी कार्यालयात उचंगी प्रकल्पग्रस्तांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.
यावेळी खासदार संजय मंडलिक, आमदार राजेश पाटील, जिल्हाधिकारी दौलत देसाई, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता महेश सुर्वे, जिल्हा पुनर्वसन अधिकारी अश्विनी जिरंगे, तहसिलदार (पुनर्वसन) वैभव पिलारे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए.वाय.पाटील, शिवसेनेचे विजय देवणे, धरणग्रस्तांचे प्रतिनिधी धनाजी गुरव, संपत देसाई, संजय तरडेकर, अशोक जाधव उपस्थित होते