कोल्हापूर : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर न्यायालयाच्या सूचनेनुसार अटी व नियमांचे पालन करून गेल्या सहा महिन्यांत सुमारे १५० बंदीजनांना पॅरोल व जामिनावर सोडण्याची कार्यवाही करण्यात आली आहे.
कोरोना महामारीचा संसर्ग कारागृहात होऊ नये या पार्श्वभूमीवर सात वर्षांच्या आतील शिक्षेतील बंद्यांना जामीन व पॅरोलवर सोडण्याची कार्यवाही गतवर्षीपासून संपूर्ण राज्यातील कारागृहात सुरू आहे. येथील कळंबा मध्यवर्ती कारागृहात क्षमतेपेक्षा अधिक बंदी असल्याने तेथे कोरोनाचा संसर्ग होण्याची दाट शक्यता होती. तो संसर्ग टाळण्यासाठी दक्षता म्हणून कारागृह प्रशासनाने आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या आहेत. नव्याने दाखल होणाऱ्या बंद्यांमुळेही कारागृहात कोरोनाचा शिरकाव होऊ नये यासाठी त्यांची आयटीआय वसतिगृहातील आपत्कालीन कारागृहात व्यवस्था करण्यात आली होती. या कारागृहात नव्याने दाखल होणाऱ्या बंद्यांना १५ दिवस ठेवून त्यांची तपासणी करून नियमानुसार बिंदू चौक उपकारागृहात अगर कळंबा कारागृहात स्थलांतरित केले जाते. सात वर्षांच्या आतील शिक्षा असणाऱ्या गुन्ह्यांतील शिक्षेतील व न्यायालयीन बंद्यांना जामीन अगर पॅरोल मिळावा यासाठीचा प्रस्ताव तयार केला होता. त्याला मंजुरी दिल्यानंतर कारागृह प्रशासनाने जूनअखेर १५० जणांना जामीन व पॅरोलवर बाहेर सोडले. गतवर्षी ४१६ बंद्यांना या प्रक्रियेंतर्गत सोडले असल्याचे कारागृह अधीक्षक चंद्रमणी इंदूरकर यांनी सांगितले.