कोल्हापूर : हमीभावापेक्षा कमी दराने दूधाची खरेदी करून दूध उत्पादक संघाकडून दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांची प्रतिलिटर सरासरी १२ रुपये या प्रमाणे दररोज १५०० कोटींची लूट केली जात असल्याचे शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेने उघडकीस आणले आहे. यासंदर्भात सुधारणा करा नाही तर १ जुलैपासून दूध आंदोलन सुरू करणार असा इशारा दिल्यानंतर राज्याचे दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांनी तातडीने आज शुक्रवारी सकाळी ११ वाजता दूध संघ व शेतकरी संघटनांसमवेत बैठक बोलावली आहे. कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकूळ), पुणे जिल्हा दूध उत्पादक संघ कात्रज आणि शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विठ्ठल पवार राजे यांना या बैठकीसाठी बोलवले आहे.
राज्यात संघटीत दूध संघाकडून १ कोटी २५ लाख लिटर तर संघटीतपणे १ कोटी लिटर असे एकूण २ कोटी २५ लाख लिटर दूध संकलित होते. मात्र राज्याची साडेतेरा कोटी लोकसंख्येचा विचार करता प्रतिमाणसी २०० मिली वापर गृहीत धरला तर रोजचे २ कोटी ७० लाख लिटर दूध लागते. पण सध्या २ कोटी २५ लाख लिटरच दुधाचे उत्पादन होते, म्हणजेच अजूनही ४५ लाख लिटर दुधाचा तुटवडा भासत आहे. तरीदेखील अतिरिक्त दूध झाल्याचे कारण पुढे करत दूध संघाकडून सातत्याने दरात कपात केली जात आहे. याविरोधात शेतकरी संघटनांनी संघटीतपणे आवाज उठवल्यानंतर शासनाने गाय व म्हैस दूधाचा किमान हमीभाव निश्चित केला. त्यानुसार गाईच्या दुधासाठी २७ तर म्हशीच्या दुधाला ३६ रुपये याप्रमाणेच उत्पादकांना किमान दर द्यावा असे सूत्र ठरले. पण दूध भूकटी पडून असल्याचे आंतरराष्ट्रीय बाजारात दर पडल्याचे, अतिरिक्त दूध उत्पादन झाल्याचे सांगत या किमान हमीभावाचे सूत्र दूध संघाकडून पायदळी तुडवले जात असल्याने दूध उत्पादकांचे नुकसान होत आहे. शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विठ्ठल पवार राजे यांनी दूध संघाकडून शेतकऱ्यांच्या लुटीचा ताळेबंदच तयार केला आहे. दूध खरेदी व विक्री दरातील दुप्पटीच्या तफावतीमुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांचे तर नुकसान होत आहेच, शिवाय ग्राहकांनाही जास्त दराने दूध खरेदी करावे लागत आहे.
चौकट
गाय दूध
गाईच्या दुधाचा हमीभाव प्रतिलिटर २७ रुपये असताना तो २० रुपयांनी खरेदी केला जात आहे. विक्री मात्र ४८ रुपये लिटरने केली जात आहे. यातील प्रक्रिया खर्च १० रुपये वजा केला तर ३८ रुपये दूध संघाकडे राहतात. उत्पादकांना मात्र यातील केवळ २० रुपये दिले जात आहेत, म्हणजेच लिटरमागे १८ रुपयांचा फरक दिसत आहे.
चौकट
म्हैस दूध
म्हैस दुधाचा हमीभाव प्रतिलिटर ३६ रुपये असताना २५ ते २७ रुपयांना दूध खरेदी केले जात आहे. विक्री मात्र ५४ ते ५८ रुपये प्रतिलिटरने होत आहे. यातही प्रक्रिया खर्च १० रुपये वजा जाता लिटरमागे तब्बल १७ रुपये संघाकडे शिल्लक राहत आहेत. उत्पादकांना मात्र लिटरला ३० रुपये देखील मिळत नाहीत.