कोल्हापूर : जुलै-ऑगस्टमध्ये घेण्यात आलेल्या दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने आज, शुक्रवारी ऑनलाईन जाहीर केला. त्यात कोल्हापूर विभागांतर्गत येणाऱ्या कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील दहावी, बारावीतील एकूण १५०६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या निकालाची माहिती शिक्षण मंडळाचे कोल्हापूर विभागीय डी. एस. पोवार यांनी दिली.यावर्षीच्या पुरवणी परीक्षेसाठी दहावीतील १०६४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १०२० जणांनी परीक्षा दिली, तर ३३५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यामध्ये २२८ मुले आणि १०७ मुली आहेत. मुलांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण मुलींच्या तुलनेत ०.४७ टक्क्यांनी जादा आहे. दहावीच्या निकालात गेल्यावर्षीपेक्षा ३. १२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. बारावीच्या परीक्षेसाठी यंदा ३९५४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील ३९४२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यातील ११७१ जण उत्तीर्ण झाले. त्यामध्ये ७७२ मुले, तर ३९९ मुली आहेत. त्यात मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण मुलांपेक्षा १३.९६ टक्के जादा आहे.गेल्यावर्षीपेक्षा यंदा बारावीच्या निकालात ७.४३ टक्क्यांनी निकाल वाढला आहे. दहावी, बारावीतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेशित होता येणार आहे. त्यामुळे त्यांचे शैक्षणिक वर्ष वाचणार आहे. दरम्यान, बारावीच्या परीक्षेत कोल्हापूर विभागात कॉपीकेस प्रकरणी ५ विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली.
थोडक्यात निकालदहावीचे उत्तीर्ण विद्यार्थी : ३३५निकालाची टक्केवारी : ३२.८४बारावीचे उत्तीर्ण विद्यार्थी : ११७१निकालाची टक्केवारी : २९.७०
गेल्या तीन वर्षांतील निकालवर्ष दहावी बारावी२०१९ १५.१७ टक्के २०.०४ टक्के२०२० ३०.१७ टक्के १४.८० टक्के२०२१ २९.७२ टक्के २२.२६ टक्के
मार्चच्या परीक्षेत ज्या विद्यार्थ्यांचे एक-दोन विषय राहिल्याने अनुत्तीर्ण झाल्याने त्यांचे वर्ष वाया जाणार होते; मात्र जुलैमधील पुरवणी परीक्षेमुळे त्यांना चांगली संधी मिळाली. कोल्हापूर विभागातून दहावी-बारावीतील उत्तीर्ण झालेल्या १५०६ विद्यार्थ्यांचे वर्ष वाचले आहे. यावर्षी पुरवणी परीक्षेचा निकाल चांगला लागला आहे. -डी. एस. पोवार, विभागीय सचिव, शिक्षण मंडळ