कोल्हापूर : केंद्र सरकारतर्फे राबविण्यात येणाऱ्या अमृत २.० योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातून शहरातील सार्वजनिक स्वच्छतेसाठी मलनिस्सारण प्रकल्प व रंकाळा तलाव पुनरुज्जीवन प्रकल्प व्यवस्था करण्यासाठी एकूण १५२ कोटी ४० लाखांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिली.आवश्यक प्रस्ताव शासन स्तरावर सादर करण्याच्या सूचना महापालिका अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. त्यानुसार महापालिका प्रशासनाकडून शहरात जिथे भुयारी गटर योजना अस्तित्वात नाही त्या ठिकाणी सुमारे २१५ कि. मी. पाईपलाईनची भुयारी गटर करणे, शहरात १०१ एम. एल. डी क्षमतेचे मलनिःसारण केंद्र उभारणे आणि रंकाळा तलाव संवर्धन आणि पुनरुज्जीविकरणासाठी आवश्यक एकूण रु.३५४ कोटी इतक्या रक्कमेचे स्वतंत्र तीन प्रस्ताव शासनाकडे सादर केले होते. त्यातील मलनिस्सारण प्रकल्पाच्या तीन कामांसाठी ५७.३२ कोटी, ५१.१३ कोटी आणि ३१.९६ कोटी तर रंकाळा तलावाच्या पुनरुज्जीवन प्रकल्पास ११.९९ कोटींचा असा एकत्रित १५२.४० कोटींचा निधी मंजूर झाला आहे.यामध्ये मलनिस्सारण प्रकल्पाअंतर्गत संकलन आणि वाहतूक व्यवस्था, पूर्ण गुरुत्वाकर्षण गटार करणे, सांडपाणी पंपिंग स्टेशन उभारणे, पंपिंग मशिनरी, राईजिंग मेन नेटवर्क, सर्वेक्षण कार्य, जनरेटर प्लॅटफॉर्म उभारणे, विश्वकर्मा ओल्या विहिरीला चेंबर जोडणे, विश्वकर्मा ओल्या विहिरीपासून एसटीपीपर्यंत वाढणारे पाणी प्रवाहित करणे, दसरा चौकातील एसएससी बोर्ड एसटीपी ते जयंती नाला येथे प्रक्रिया केलेले पाणी निर्गत करणे यासह इतर कामांचा समावेश आहे.तर रंकाळा पुनरुज्जीवनअंतर्गत रंकाळा तलाव येथील पदपथ उद्यानात रिटेनिंग वॉल (काँक्रीट वॉल) बांधणे, पदपथ उद्यान येथे पदपथाचे बांधकाम (लांबी २३४ मीटर) करणे, तलावाच्या नेव्ही इकोलॉजीचे पुनरुत्थान, पुनर्संचयित आणि पुनरुत्थान करणे आदी कामांचा समावेश आहे. अमृत २.० अभियानाअंतर्गत मंजूर निधीत केंद्र शासन ३३.३३%, राज्य शासन ३६.६७% आणि महानगरपालिका ३०% हिस्सा राहणार आहे.
अमृत अभियानातून कोल्हापूरला १५२ कोटींचा निधी मंजूर, राजेश क्षीरसागर यांची माहिती
By भारत चव्हाण | Published: February 27, 2024 4:48 PM