लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेत आत्तापर्यंत जिल्ह्यात २ हजार २८ कर्ज प्रकरणे बॅंकेमार्फत मंजूर झाली असून बँकांनी लाभार्थ्यांना १५७ कोटींचे कर्ज वितरित केले आहे. त्यातील १ हजार ७१९ जणांना महामंडळामार्फत १० कोटी ६० लाख ६ हजार ६७८ रुपयांचा व्याज परतावा प्राप्त झाला आहे.
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेत आत्तापर्यंत राज्यातील २३ हजार १४० लाभार्थ्यांना बँकांनी १ हजार ८९९ कोटी ८८ लाख ८८ हजार ६९७ रुपये इतके कर्ज वाटप केले आहे. त्यातील १८ हजार ६४६ लाभार्थ्यांना व्याज परतावा सुरू झाला असून, ९७ कोटी ६१ लाख ७० हजार १४७ रुपये व्याज परताव्याची रक्कम देण्यात आली आहे. आजतागायत एकही कर्ज खाते एन.पी.ए.मध्ये गेलेले नाही. या योजनेत वित्त व नियोजन राज्यमंत्री शंभुराज देसाई, महामंडळाचे माजी अध्यक्ष नरेंद्र पाटील व माजी उपाध्यक्ष संजय पवार यांच्यासह जिल्हाधिकारी दौलत देसाई, व्यवस्थापकीय संचालक अनिल पाटील, अग्रणी जिल्हा बॅंक प्रबंधक राहुल माने, सहायक आयुक्त संजय माळी समन्वयक शुभांगी जाधव, सतीश माने, पुष्पक पालव, ऋषिकेश आंग्रे यांची मोलाचे योगदान दिले.
---