कोल्हापूर : कोल्हापूर शहर कोरोना संसर्गाच्या बाबतीत हॉटस्पॉट ठरले आहे. गेल्या पंधरा दिवसांत १५८४ व्यक्ती कोरोनाबाधित झाल्या असून २५ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. शहरात राेज दीडशेच्या आसपास नवीन रुग्ण सापडत आहेत. गेला..गेला म्हणत कोरोना विषाणूने आपले रौद्ररूप कसे धारण केले याचे उदाहरण म्हणजे ही आकडेवारी आहे.
कोल्हापूर शहर कोरोनाच्या पहिल्या लाटेतसुद्धा हॉटस्पॉट ठरले होते. अतिशय प्रयत्नपूर्वक कोरोनाची ही लाट थोपविण्यात महापालिका प्रशासनास यश मिळाले. डिसेंबर व जानेवारी महिन्यात तर कोरोना विषाणू आता गेला अशीच शहरवासीयांची भावना झाली होती. याच दरम्यान दुसरी लाट येण्याची शक्यता व्यक्त केली होती. त्यामुळे खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले होते.
दि. १६ जानेवारीपासून शहरात लसीकरण सुरू झाल्यानंतर तर कोरोना गेला, आपण सुटलो. आता लस आली असल्याने आपणाला काही होणार नाही अशा आविर्भावात शहरवासीय राहिले. लसीकरणाकडे दुर्लक्ष केले. मास्क, सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझर या सगळ्या गोष्टी विसरून गेले, पण फेब्रुवारीपासून कोरोनाने आपले हात-पाय पुन्हा पसरण्यास सुरुवात केली. एप्रिल महिना तर कोरोना विस्फोटाचा काळ ठरला आहे.
-शंभर दिवसांत २९६५ रुग्ण, ५१ मृत-
जानेवारी, फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल महिन्याचे पंधरा दिवस धरून साडेतीन महिन्यांत २९६५ नवीन रुग्ण आढळले, तर ५१ व्यक्ती मृत झाल्या. कोरोनाचा विस्फोट किती मोठा आहे हेच या आकडेवारीतून पहायला मिळते. खबरदारी घेतली नाही आणि पुढची पंधरा दिवस अशीच परिस्थिती राहिली तर काळ कठीण असेल.
महिना कोरोनाबाधित रुग्ण मृतांची संख्या
- जानेवारी २२५ ०४
- फेब्रुवारी ३४३ १५
- मार्च ८१६ ०७
- एप्रिल (१५दिवस) १५८४ २५
-ना प्रशासन दक्ष, ना नागरिक -
कोरोनाला रोखण्याच्या लढाईत पहिल्या लाटेत जसे महापालिका प्रशासनाने झोकून देऊन काम केले तसे दुसऱ्या लाटेत पहायला मिळत नाही. बैठका, कागदावरील नियोजन, नियुक्ती आदेश, जबाबदाऱ्या वाटणे अशी कामे होत आहेत; परंतु प्रत्यक्ष ग्राऊंडलेव्हलला काहीच होताना दिसत नाही. प्रतिबंधित क्षेत्र जाहीर करून बॅरिकेड्स लावणे, बाधित रुग्णाच्या घरावर स्टीकर चिकटविणे, त्याच्या जवळच्या संपर्कात आलेल्यांची चाचणी करून घेणे, प्रभाग सचिव पातळीवरील काम या गोष्टी शहरात पहायला मिळत नाहीत. आधी रुग्ण आढळला की, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग सक्तीने होत होते, रुग्णाला ॲडमिट केले जात होते. आता कोणीही आरोग्य कर्मचारी येत नाही.