कोल्हापूर : पालकमंत्री सतेज पाटील यांच्या संपत्तीत गेल्या सात वर्षात १६ कोटी ३२ लाखांनी तर कर्जात ११ कोटी ७३ लाखांनी वाढ झाली आहे. विधान परिषद निवडणुकीसाठी सादर केलेल्या विवरण पत्रातून ही माहिती गुरुवारी स्पष्ट झाली.
पालकमंत्री पाटील यांनी २०१४ मध्ये विधानसभा निवडणूक लढवली तेव्हा दिलेल्या विवरण पत्रात त्यांची एकूण संपत्ती २३ कोटी ५३ लाखांची होती. ती आता ३९ कोटी ८८ लाख झाली आहे. सात वर्षात प्रत्येक वर्षी एक कोटींपेक्षा अधिक संपत्तीत वाढ झाली आहे. सात वर्षापूर्वी त्यांच्या नावे ४ कोटी ८ लाखांचे कर्ज होते. आता त्यांच्या नावे १६ कोटी ५३ लाख, पत्नी प्रतिमा यांच्या नावे ७६ हजार ११० रुपयांचे कर्ज आहे. त्यांचे ४७ सहकारी, राष्ट्रीयीकृत बँका आणि खासगी वित्तीय संस्थांमध्ये गुंतवणूक व बँकिंग व्यवहार आहेत. ३१ सहकारी संस्थांमध्ये ते सभासद आहेत.
सध्या त्यांच्याकडे रोख १ लाख २५ हजार ६०० रुपये, तर त्यांच्या पत्नी प्रतिमा यांच्याकडे ९९ हजार आणि मुलगी देवश्रीकडे १० हजार रुपये आहेत. पाटील यांच्या नावे टाटा सफारी आहे. त्यांच्याकडे ६२ तोळे सोने आहे. त्यामध्ये जडजवाहिर, सोने, चांदीचा समावेश आहे. पाटील, त्यांच्या पत्नी, मुलीच्या नावे कसबा बावडा, तळसंदे, सैतवडे, कोदे खुर्द, साखरी, बावेली, अंबप या ठिकाणी शेतजमीन व घर अशी एकूण २० कोटींवर मालमत्ता आहे.
शेती, नोकरी
विवरणपत्रात पालकमंत्री पाटील आणि त्यांच्या पत्नी प्रतिमा यांनी उत्पन्नाचे स्रोत शेती आणि नोकरी अशी नोंद केली आहे. आयकर विभागाकडे त्यांनी २०२०-२१ मध्ये ३ कोटी ९ लाख १६ हजार २१० रुपयांचे विवरण पत्र भरले आहे. सन २०१६-१७ मध्ये १ कोटी ६९ लाख ७७ हजार १८२ रुपयांचे विवरण पत्र भरले होते. सन २०१९-२० मध्ये पाटील यांच्या पत्नी प्रतिमा यांनी १ कोटी १६ लाख ६१ हजार ९६३ रुपयांचे विवरण आयकर विभागाकडे भरले आहे.
फौजदारी कारवाई
प्रदूषण नियंत्रण महामंडळाने साखर कारखाना उभारताना प्रदूषणासंबंधीच्या अटीची पूर्तता न केल्याबद्दल अध्यक्ष या नात्याने पाटील यांच्यावर २००४ साली फौजदारी कारवाई केली आहे. यासंबंधीचा खटला उच्च न्यायालयात प्रलंबित आहे.