निवास वरपे
लोकमत न्यूज नेटवर्क
म्हालसवडे : चाफोडी पैकी दोनवडी (ता. करवीर) येथील श्रद्धा सर्जेराव पाटील या आठ महिने वयाच्या चिमुरडीला स्पायनल मस्कुलर अट्रॉफी टाइप वन हा दुर्मीळ आजार झाला आहे. या दुर्मीळ आजारातून बरे होण्यासाठी तिला झोलगेन्स्मा हे १६ कोटी रुपयांचे इंजेक्शन देणे गरजेचे आहे. यातून बरे होण्यासाठी समाजाच्या आर्थिक दातृत्वाची गरज आहे. एसएमए अशा दुर्मीळ आजाराचे निदान झालेला कोल्हापूर जिल्ह्यातील हा पहिलाच रुग्ण असल्याचे निदर्शनास येत आहे.
कोल्हापूरपासून तीस किलोमीटर अंतरावरील सातेरी डोंगर कपारीत वसलेले दोनवडी हे दीड-दोनशे लोकवस्तीचे छोटंसे खेडे. येथील वीटभट्टीवर मजुरी करणाऱ्या सर्जेराव पाटील यांची श्रद्धा ही मुलगी जन्मानंतर दीड महिन्यापासून आजारी आहे. तिला खाताना व श्वास घेताना गुदमरते. हातापायांची ताकद पूर्णत: नाहीशी झाली आहे. कोल्हापुरातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर तिच्यावर मुंबईतील कोकिळाबेन अंबानी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू करण्यात आले आहेत. आठ महिन्यांत तिच्यावर दोन लाखांहून अधिक खर्च झाला असून, पुढील उपचाराचा खर्च त्यांना पेलवत नाही.
श्रद्धाला वाचवण्यासाठी पुढील दोन महिन्यांच्या कालावधीमध्ये अमेरिकेहून १६ कोटी रुपयांचे इंजेक्शन मागवून घेऊन द्यावे लागणार आहे. मुलीचा जीव वाचवण्याकरता दानशूर व्यक्ती व सामाजिक सेवाभावी संस्थांनी आर्थिक मदत करावी, अशी तिच्या पालकांनी मागणी केली आहे.
चौकट :
आमची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. १६ कोटी रुपये गोळा करणे हे आमच्या आवाक्याबाहेरील असून, मुलीला वाचवण्यासाठी सर्वांनी आर्थिक मदत करावी.
-बाजीराव पाटील, मुलीचे वडील
फोटो आहे.
खाते नं
Sradha Patil
७००७०१७१७२२१५७९
IFSC Code - YESBOMSNOC
चौकट :
‘या आजाराचे रुग्ण दिवसेंदिवस वाढू लागले आहेत. अशा आजारी मुलांच्या पालकांना उपचाराकरिता मदत मागावी लागत आहे. हा आजार व त्यावरील उपचार हे कोणालाही परवडणारे नाहीत. शासनाने या आजाराने त्रस्त असणाऱ्या रुग्णांच्या उपचाराची सोय करावी, तसेच अशा आजाराच्या रुग्णांच्या पालकांना सर्व प्रकारच्या शासकीय सवलती देऊन सहकार्य करावे.
-पल्लवी देशपांडे, जिल्हा कार्यक्रम सहायक, आरोग्य विभाग
चौकट :
जेनेटिक स्पाइनल मस्कुलर ऑट्रोफी म्हणजेच एसएमए हा आजार शरीरात एसएमएन १ जीनच्या कमतरतेमुळे होतो. हा आजार जास्त करून लहान मुलांना होतो आणि त्रास वाढून रुग्णाचा मृत्यू होतो.
चौकट :
‘झोलगेन्स्मा हे इंजेक्शन अमेरिका, जर्मनी आणि जपानमधून मागवण्यात येते. १६ कोटी रुपये किमतीचे हे इंजेक्शन रुग्णाला एकदाच देण्यात येते.