कोल्हापूर : राष्ट्रीय सरोवर संवर्धन योजनेतून रंकाळा प्रदूषणमुक्तीसाठी पहिल्या टप्प्यात ८.६६ कोटींचा निधी आला. आता दुसऱ्या टप्प्यातील १०० कोटींच्या निधीचे वेध महापालिकेला लागले आहेत. रंकाळा संवर्धनासाठी १६ लाख रुपये खर्चून विकास आराखडा (डीपीआर) तयार करण्यात येणार आहे. यासाठी तज्ज्ञ कंपन्यांना महापालिका प्रशासनाने निमंत्रित केले असून आयुक्त पी. शिवशंकर यांनी मंगळवारी या परिसराची पाहणी करून आवश्यक कामांची यादी तयार केली आहे. त्यानुसार डीपीआर तयार करून शासनास सादर केला जाणार आहे.राष्ट्रीय तलाव संवर्धन योजनेतून पहिल्या टप्प्यात रंकाळ्यासाठी आलेल्या निधीतून साडेचार कोटी रुपयांत तांबट कमान ते रंकाळा टॉवर पाईपलाईन टाकण्याचे काम करण्यात आले. मात्र सांडपाणी अजूनही थेट रंकाळ्यात मिसळते. केंदाळ काढणे, निर्माल्य कुंडाचे बांधकाम, ओव्हरफ्लो कमान, आदी कामे वगळता एकही भरीव काम पहिल्या टप्प्यात झालेले नाही. साडेआठ कोटी रुपये खर्च करूनही रंकाळ्याच्या दुखण्यात तसूभरही फरक पडलेला नाही, याची गंभीर दखल आयुक्त पी. शिवशंकर यांनी घेतली.दुसऱ्या टप्प्यातील ड्रेनेज लाईन टाकणे, सांडपाणी प्रक्रिया केंद्र, संरक्षक कठड्यांची उंची वाढविणे, गाळ काढणे किंवा स्थूल ठेवण्यासाठी उपाययोजना, व्हॉल्व्हची दुरुस्ती, पदपथ, सांडपाणी रोखणे, पाणी शुद्ध राहण्यासाठी प्रभावी यंत्रणा उभारणे, रंकाळ्याचे नैसर्गिक पुनर्भरण करणे, आदींसाठी राष्ट्रीय सरोवर संवर्धन योजनेतून तब्बल १०० कोटींचा निधी उपलब्ध होणार आहे. यासाठी डीपीआर तयार केला जाणार आहे. रंकाळ्यासाठी ५० लाखांचा निधी : अमल महाडिकशहराचे वैभव असलेला रंकाळा दुर्दशेच्या फेऱ्यात अडकला आहे. याप्रश्नी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना केलेल्या विनंतीवरून जिल्हा नियोजन मंडळातून तत्काळ ५० लाख रुपयांची तरतूद करण्याचे जाहीर केले आहे, अशी माहिती आमदार अमल महाडिक यांनी पत्रकाद्वारे दिली. रंकाळा संवर्धनासाठी खासदार धनंजय महाडिक यांनी यापूर्वीच १० लाख रुपये, तर अमल महाडिक यांनी पाच लाख रुपयांचा निधी देण्याची घोषणा केली आहे. रंकाळ्यासाठी राज्य शासनाच्या नावीन्यपूर्ण योजनेतून निधी उपलब्ध करण्याची मागणी आमदार अमल महाडिक यांनी केली होती. त्यास तत्काळ प्रतिसाद देत मंत्री पाटील यांनी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर केला. लाचप्रकरण व महापौर तृप्ती माळवी यांचा राजीनामा याचा काहीही संबंध नाही. ९ फेब्रुवारीला त्यांची सहा महिन्यांची मुदत संपली आहे. राजकारणात विश्वासार्हता महत्त्वाची आहे. ‘आघाडी धर्मा’प्रमाणे राजीनामा द्यावाच लागेल. त्यांनी जाहीर केल्याप्रमाणे त्या सोमवारी राजीनामा देतील.- हसन मुश्रीफ, आमदार रंकाळ्याचे संपूर्ण संवर्धन करण्यासाठी ठोस उपाययोजनेची गरज आहे. दर तीन महिन्यांनी रंकाळ्याला जलपर्णी, जंतुसंसर्ग, पाण्याचा रंग बदलणे, दुर्गंधी, आदी व्याधी जडतात. त्यामुळे राज्यातील अग्रणी पर्यटनस्थळ निर्माण करण्याच्या दृष्टीनेच डीपीआर तयार करण्यात येणार आहे. - पी. शिवशंकर, आयुक्त विशेष सभेत चर्चा होणार राजीनाम्याचीचमहापौर तृप्ती माळवी यांनी सोमवारी झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत राजीनामा देण्यास नकार दिला. मात्र नेते व नगरसेवकांच्या मनधरणीनंतर सोमवारी (दि.१६) होणाऱ्या विशेष सभेत त्यांनी राजीनामा देण्याचे संकेत दिले. राजीनाम्याचा सोमवारचा मुहूर्त ठरल्याप्रमाणे रंकाळा तलाव सुधारणा व सुशोभीकरणासाठी विकास आराखडा तयार करण्यासाठी महापालिकेची ‘विशेष सभा’ बोलाविण्यात आली आहे. रंकाळ्याचे निमित्त पुढे करत महापौरांच्या राजीनाम्यासाठी बोलावलेल्या या सभेकडे शहरवासीयांचे लक्ष लागून राहिले आहे. एक सभा झाल्यानंतर दुसरी सभा लगेच घेण्यासाठी चार स्थायी समिती सदस्यांचे शिफारसपत्र आवश्यक असते. ‘स्थायी’ने बोलाविलेल्या सभेसाठी शेवटी महापौरांची मंजुरी मिळाली नाही, तर सभा घेता येत नाही. त्यामुळे राजीमान्यासाठीची सभा बोलाविणे हे सर्वस्वी महापौर तृप्ती माळवी यांच्यावरच अवलंबून होते. त्यामुळे त्या सभा कधी बोलाविणार याकडे सर्वांचे लक्ष होते. महापौरांच्या मंजुरीने नगरविकास विभागाने सोमवारी (दि.१६) रंकाळ्याच्या समस्या व निराकरणाचे उपाय यावर चर्चा करण्यासाठी ‘विशेष सभा’ बोलाविण्यात आल्याचे जाहीर केले आहे.
रंकाळा ‘डीपीआर’ करण्यास १६ लाख
By admin | Published: February 11, 2015 12:09 AM