कोल्हापूर : मागील हंगामातील गाळप झालेल्या उसाला अतिरिक्त पैसे देण्यास जिल्ह्यातील १६ साखर कारखान्यांनी हात वर केले आहेत. या कारखान्यांनी पैसे कसे देऊ शकत नाही, असे विविध कारणे दिली आहेत. केवळ सात कारखान्यांनी पैसे देण्याची समर्थता दर्शवली आहे.गेल्या दोन वर्षांपासून साखरेला चांगला दर असल्याने बहुतांशी कारखान्यांनी एफआरपीप्रमाणे उसाला पैसे दिले आहेत. यंदाचा गळीत हंगाम सुरू होण्यापूर्वी स्वाभिमानी शेतकरी संघटना व आंदोलन अंकुश यांनी मागील हंगामातील उसाला एफआरपीपेक्षा अधिक दर देण्याची मागणी केली होती. त्यावर आंदोलन चांगलेच पेटले होते. ‘स्वाभिमानी’ शेतकरी संघटनेने राष्ट्रीय महामार्ग रोखला होता. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या मध्यस्थीने ज्या कारखान्यांनी प्रतिटन तीन हजारांपेक्षा कमी दर दिला आहे, त्यांनी शंभर रुपये तर तीन हजारांपेक्षा अधिक दर दिलेल्या कारखान्यांनी ५० रुपये शेतकऱ्यांना देण्याचा तोडगा निघाला होता.दोन महिन्यात साखर आयुक्तांची मान्यता घेऊन दिले जाणार होते. मात्र, हंगाम संपत आला तरी केवळ सात कारखान्यांनी अतिरिक्त पैसे दिले आहेत किंवा देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. सोळा कारखान्यांनी मात्र हे पैसे देण्यास असमर्थता दर्शवली आहे.
पैसे देण्याची जिल्हा प्रशासनाची जबाबदारीजिल्हाधिकाऱ्यांनी मध्यस्थी करून पैसे देण्याचे कबूल केले होते. मात्र, अद्याप शेतकऱ्यांच्या हातात दमडीही पडलेली नाही. हे पैसे देण्याची जबाबदारी जिल्हा प्रशासनाची असल्याचे शेतकरी संघटनांचे म्हणणे आहे.
या कारखान्यांनी दर्शवली तयारी..शरद, दत्त शेतकरी, शाहू, अथर्व, जवाहर, मंडलीक.
अशी दिलीत कारखान्यांनी कारणे..
- राजाराम - उत्पन्न कमी असल्याने प्रतिटन २९०० रुपयांपेक्षा अधिक दर देऊ शकत नाही.
- वारणा - एफआरपी/ आरएसएफपेक्षा जादा दर दिल्याने अतिरिक्त दर देऊ शकत नाही.
- कुंभी - विशेष लेखापरीक्षकांच्या अहवालानुसार प्रस्ताव सादर केलेला नाही.
- अथणी - वारंवार कळवूनही प्रस्ताव सादर केलेला नाही
- गुरुदत्त - वारंवार कळवूनही प्रस्ताव सादर केलेला नाही
- गायकवाड - विशेष लेखापरीक्षकांच्या अहवालानुसार प्रस्ताव सादर केलेला नाही.
- डी. वाय. पाटील ५० रुपयांपर्यंत अतिरिक्त दर अदा केलेला आहे.
- आजरा - एफआरपीपेक्षा १७६ रुपये जादा दिल्याने अतिरिक्त दर देऊ शकत नाही.
- गडहिंग्लज - २०२२-२३ मध्ये कारखाना बंद राहिला
- बिद्री - एफआरपीपेक्षा ११९.४५ रुपये जादा दिले
- भोगावती - एफआरपीपेक्षा ५.६९ रुपये जादा दर दिला, अतिरिक्त दर अशक्य
- पंचगंगा - प्रस्ताव सादर नाही
- घोरपडे - प्रस्ताव सादर नाही
- दालमिया - खासगी असल्याने लागू होत नाही.