कोल्हापूर : स्वत:ची इमारत नसल्याने भाड्याच्या खोलीत भरणाऱ्या, पडझडीमुळे नुकसान झालेल्या जिल्ह्यातील अंगणवाड्यांचा आता मात्र कायापालट होणार आहे. १६४ अंगणवाड्या नव्याच बांधल्या जाणार आहेत, तर नादुरुस्त असलेल्या ३५३ अंगणवाड्यांची दुरुस्ती होणार आहे. या कामासाठी शासनाकडून तब्बल १७ कोटींचा निधी प्राप्त झाला आहे.
पालकमंत्री सतेज पाटील यांच्या पुढाकाराने अंगणवाड्यांच्या बांधकाम व दुरुस्तीसाठी यंदा कधी नव्हे इतका पैसा आला आहे; पण जागा नसल्याने बांधकाम करण्याच्या अडचणी होत्या. यावर जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाने ई-पासचा नियम लावत जागा असणाऱ्यांनाच तातडीने मंजुरी देण्याचे निश्चित केले. त्यानुसार प्रशासकीय मान्यतेनंतर आता थेट टेंडर प्रक्रियेस हिरवा कंदील दर्शविण्यात आला आहे. महिला बालकल्याण समितीच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
जिल्ह्यात ३९९४ अंगणवाड्या आहेत, त्यापैकी ४५० अंगणवाड्या भाड्याच्या खोल्यात भरत होत्या. त्यांना स्वत:ची इमारत व्हावी यासाठी गेली दहा वर्षे निधी येतो, परत जातो, काही तांत्रिक अडथळे येतात; पण यावर्षी पालकमंत्री पाटील यांनी सहा लाखांची रक्कम साडेआठ लाख रुपये करवून आणण्यात पुढाकार घेतल्याने अंगणवाडी बांधकामाचा मार्ग मोकळा झाला.
जागा उपलब्ध होईल, तसेच निधीही भरघोस आल्याने महिला बालकल्याण विभागाने मार्चपूर्वी तो खर्च करणे अपेक्षित असल्याने तातडीने प्रक्रियाही सुरू केली आहे. नवीन इमारतीसाठी १७९ प्रस्ताव होते; पण जागेमुळे काही प्रस्ताव मागे घेतल्याने शिल्लक राहिलेल्या १६४ अंगणवाड्यांच्या बांधकामासाठी टेंडर काढण्याचे काम सुरू झाले. दुरुस्तीमध्येही ३५३ अंगणवाड्यांचा समावेश करण्यात आला. त्यासाठी प्रत्येकी एक लाख याप्रमाणे ३ कोटी ५३ लाखांचा निधी खर्चासही समितीने मान्यता दिल्यानंतर आता पावसाळ्यापूर्वी ही सर्व कामे पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
चौकट ०१
नवीन इमारती : १६४ : १३ कोटी ९४ लाखांचा निधी
दुरुस्ती : ३५३ : ३ कोटी ५३ लाख
चौकट ०२
पदाधिकाऱ्यांच्या तालुक्यात सर्वाधिक मंजुरी
नवीन इमारत मंजुरीच्या यादीवर नजर टाकली तर १६४ पैकी ११५ इमारती या गडहिंग्लज, कागल, शाहूवाडी, शिरोळ, हातकणंगले, करवीर या पदाधिकारी व त्यांच्या संबंधित नेत्यांच्या मतदारसंघातील आहेत. शिल्लक राहिलेल्या ४९ इमारती या गगनबावडा, आजरा, चंदगड, राधानगरी, भुदरगड, पन्हाळा तालुक्यांतील आहेत.
बॉक्स ०१
तालुकानिहाय नवीन इमारत संख्या
गगनबावडा : ६
गडहिंग्लज : ९
आजरा : ९
चंदगड : ९
भुदरगड : ८
राधानगरी : ९
कागल : १७
शाहूवाडी : ११
पन्हाळा : ७
शिरोळ : २२
हातकणंगले : २९
करवीर : २४
प्रतिक्रिया-
अंगणवाड्यांच्या बांधकामाचा विषय गेले कित्येक वर्षांपासून लाेंबकळत आहे. यावर्षी तो बऱ्यापैकी मार्गी लागत असल्याने समाधान वाटत आहे. अजूनही अडीचशेच्यावर अंगणवाड्या इमारतीविना आहेत, त्यांचाही प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावू. जागेच्या बाबतीतही तोडगा काढण्याचा प्रयत्न करू.
पद्माराणी पाटील, महिला बालकल्याण सभापती, जिल्हा परिषद, कोल्हापूर.