कोल्हापूर : कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर दक्षता म्हणून कळंबा मध्यवर्ती कारागृहातील १६४ बंदींना गुरुवारी पॅरोल रजेवर मुक्त केले. मुक्त केलेल्या बंदींना काही अटी, नियमांची पूर्तता करावी लागणार आहे.
कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग कळंबा कारागृहातील बंदिजनाना होऊ नये यासाठी प्रशासनाकडून दक्षता घेतली जात आहे. कळंबा कारागृहातील बंदीची संख्या कमी करण्यासाठी कारागृह प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत. सद्या कारागृहात कोल्हापूरसह सांगली, सातारा, सोलापूर व पुणे आदी ठिकाणचे सुमारे २२०० बंदिजन आहेत. त्यांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी वेगवेगळी उपायोजना करण्यात येत आहेत. त्यासाठी गतवर्षीप्रमाणे बंदिजनांना पॅरोलसाठी अर्ज केल्यास अटी, शर्थीवर तो मंजूर करण्याची कार्यवाही सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर गुरुवारी कारागृहातून १६४ बंदिजनांंची पॅरोल रजेवर मुक्तता केली आहे. पॅरोलवर मुक्त झालेल्या बंदींनी यापूर्वी पॅरोल रजा उपभोगली असली पाहिेजे, त्या कालावधीत त्यांनी नियमांचे पालन केलेले असावे अशीही बंदिजनांना पॅरोल रजा मंजूर करताना अटी शर्थी घातल्या आहेत.