कोल्हापूर : गोरगरीब, अनाथ मुलांच्या संगोपनाची जबाबदारी घेतलेल्या पुईखडी येथील अवनि संस्थेतील पंधरा मुलींना तसेच दोघा कर्मचाऱ्यांना एकाच वेळी कोरोनाचा संसर्ग झाल्याची गंभीर बाब सोमवारी समोर आली. या प्रकारामुळे अवनितील सर्वच मुलींना धक्का बसला असून, संस्थेचे पदाधिकारीही गडबडून गेले आहेत. या सर्व मुलींची प्रकृती उत्तम असून, त्यांना तातडीने शिवाजी विद्यापीठातील कोविड केअर सेंटरमध्ये पुढील उपचाराकरिता दाखल करण्यात आले.
अवनिची एक शाळा व वसतिगृह पुईखडी येथे आहे. या ठिकाणी सध्या २५ मुली राहत आहेत. त्यातील दोघींना सोमवारी सकाळी अचानक ताप आला. संस्थेच्या प्रमुख प्रा. अनुराधा भोसले यांनी क्षणाचाही विलंब न करता याची माहिती जिल्हास्तरीय बाल कल्याण समितीला कळविली. समितीच्या सदस्या मुजावर यांनी तातडीने महानगरपालिकेचे एक पथक पाठवून त्यांच्या सहकार्याने या दोन मुलींची रॅपिड अँटिजन चाचणी केली, तर त्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.
सर्व मुली एकत्र राहत, खेळत असतात. त्यामुळे नंतर सर्वच्या सर्व २५ मुलींची तसेच तेथे काम करणाऱ्या दोन स्वयंपाकी महिला यांचीही अँटिजन चाचणी करण्यात आली. दुर्दैवाने त्यात आणखी १३ मुली तसेच दोन स्वयंपाकी महिला यांच्या चाचणीचे अहवालही पॉझिटिव्ह आले. त्यामुळे अवनि संस्थेला धक्का बसला. महापालिका पथकाने या सर्व मुलींना शिवाजी विद्यापीठातील कोविड केअर सेंटरमध्ये उपचाराकरिता दाखल करण्याचा निर्णय घेऊन पुढील कार्यवाही केली. या सर्वांना केएमटी बसमधून कोविड सेंटरला देण्यात आले. कोरोनाबाधित आढळलेल्या मुली या सहा ते अठरा वर्षे वयोगटातील आहेत.
-कसा शिरला कोरोना कळलेच नाही-
कोरोनाचा संसर्ग वाढला असल्याने संस्थेने पूर्ण खबरदारी घेऊन सर्व मुलींना तसेच त्यांच्या सेवेत असलेल्या स्वयंपाकी महिलांना कोठेही बाहेर सोडले नव्हते. संस्थेच्या मुख्य प्रवेशद्वारास कुलूप घालून बाहेरील कोणाही व्यक्तीस आत येण्यास बंदी घातलेली होती. तरीही कोरोनाची दोन मुलींना लागण झाल्याचे तसेच पाठोपाठ अन्य तेरा मुली व दोन कर्मचाऱ्यांना लागण झाल्याचे लक्षात येताच संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना धक्का बसला.
चार आठवड्यांपूर्वीच चाचणी झाली-
चार ते पाच आठवड्यांपूर्वी एक मुलीला ताप आला होता. बाहेरील कोरोना संसर्गाचे वातावरण पाहून संस्थेच्या प्रमुख अनुराधा भोसले यांनी त्या मुलीची कोरोना चाचणी करून घेतली. तेव्हा तिचा अहवाल निगेटिव्ह आल्याने सर्वांचा जीव भांड्यात पडला होता. त्यानंतर संसर्ग रोखण्याच्या बाबतीत मुलींना खूप जपले होते; पण अखेर कोरोनाने अवनिलाही गाठलेच.
कसलीच लक्षणे नाहीत, तरीही पॉझिटिव्ह -
दोन मुली वगळता अन्य पंधरा मुली व स्वयंपाकी महिलांना कसलीही लक्षणे नव्हती. त्यांना कसलाही त्रास होत नव्हता. त्यांची तब्बेत अगदी सर्वसाधारण आहे. अवनि संस्थेत कोरोना आपल्याला गाठेल आणि त्यातील १७ जण पॉझिटिव्ह येतील असे कोणालाही वाटले नाही.