कोल्हापूर : पुराच्या पाण्यात अडकलेल्या जिल्ह्यातील जवळपास २८० हून अधिक कुटुंबांतील सुमारे १४०० लोकांना जिल्हा प्रशासन आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथका (एनडीआरएफ)च्या जवानांच्या मदतीने सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले; तर आंबेवाडी, वडणगे, शिरोली, केर्ली येथे ‘एनडीआरएफ,’ अग्निशमन दल व जीवनज्योतीच्या जवानांनी बचावकार्य करून पुरात अडकलेल्या १७ जणांना बाहेर काढले. रेडेडोह येथे पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या तीन मुलांमधील एक मुलगा बेपत्ता आहे. अभिजित ऊर्फ सचिन बळिराम आगरकर (वय १८, रा. वडणगे, ता. करवीर; मूळ गाव केज, जि. बीड) असे त्याचे नाव आहे. वडणगे (ता. करवीर) येथील शिवपार्वती यात्री निवास येथे अडकलेल्या आठजणांना सकाळी सहा वाजल्यापासून तब्बल चार तास बचाव मोहीम राबवून बाहेर काढून सुरक्षितस्थळी हलविण्यात आले. ‘एनडीआरएफ’ने पाण्यात बोट टाकून यात्री निवास येथे प्रयाण केले. या ठिकाणी बचावकार्य करीत प्रदीप गोपाळ शिंदे (वय ४९), शीला गोपाळ शिंदे (७०), पौर्णिमा प्रदीप शिंदे (१८), प्रियांका प्रदीप शिंदे (२३), पुष्पा गोपाळ शिंदे (४४), राजेश शिंदे (१५), प्रतीक्षा प्रदीप शिंदे (१५) व लक्ष्मण आप्पाजी खवाडे (१७) यांना बाहेर काढले. यामध्ये ‘एनडीआरएफ’चे डेप्युटी कमांडिंग आॅफिसर आलोककुमार यांच्या नेतृत्वाखाली ४० जणांचे पथक, जीवन ज्योती संस्थेचे १० जणांचे पथक सहभागी झाले होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी शंकर बर्गे, तहसीलदार डॉ. योगेश खरमाटे उपस्थित होते. यानंतर सकाळी अकराच्या सुमारास कोल्हापूर-गगनबावडा रस्त्यावरील बालिंगा ते साबळेवाडी रस्त्यावर पुराचे पाणी आल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाल्याचे समजताच ‘एनडीआरएफ’चे पथक या ठिकाणी गेले. साबळेवाडी येथील मंगल कार्यालयात लग्नसमारंभ असल्याने वऱ्हाडी मंडळी अलीकडच्या बाजूला अडकली होती. रस्त्यावर पाणी आल्याने त्यांना पुढे जाता येत नव्हते. त्यामुळे ‘एनडीआरएफ’ व ‘जीवनज्योती’च्या जवानांच्या मदतीने त्यांना व महिलांना बोटीतून सुरक्षितपणे पलीकडे सोडले जात होते. हे मदतकार्य दिवसभर सुरू राहिले. तहसीलदार डॉ. योगेश खरमाटे यांनी येथे भेट देऊन पाहणी करून यंत्रणेला योग्य त्या सूचना केल्या. तसेच आमदार चंद्रदीप नरके व सामाजिक कार्यकर्ते राजू सूर्यवंशी यांनीही आपल्या कार्यकर्त्यांसमवेत स्वत: पाण्यात उतरून मदतकार्य केले. त्याचबरोबर जिल्ह्यातही ठिकठिकाणी बचाव आणि मदतकार्य राबविण्यात आले. प्रयाग चिखली येथील १५ कुटुंबांतील ४८ व वळिवडे येथील २५ व्यक्तींना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले. शिरोळ तालुक्यातील नृसिंहवाडी आणि कवठेसार येथील ६५ कुटुंबांतील सुमारे २११ लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले. हातकणंगले तालुक्यातील निलेवाडी आणि घुणकी येथील १२६ कुटुंबांतील ६५० व्यक्तींना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले. भुदरगड तालुक्यातील शेणगाव येथील सहा कुटुंबांतील २४ लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले. पन्हाळा तालुक्यातील मराठवाडी येथे दरड कोसळण्याची शक्यता असल्याने १५ लोकांना केकतवाडी येथे स्थलांतरित करण्यात आले. पंचगंगा नदीची पाणीपातळी ४५ फूट ६ इंच गेली आहे. त्यामुळे कोल्हापूर शहरातील काही सखल भागांमध्ये पुराचे पाणी गेल्याने तेथील १०७ कुटुंबांतील ४६३ लोकांना महापालिका प्रशासनाने सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केले आहे. यापुढेही पुराचा धोका असणाऱ्या भागातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्याचे काम प्रशासनाने गतिमान केले आहे.
पुरात अडकलेल्या १७ जणांची सुटका; एक मुलगा बेपत्ता
By admin | Published: July 14, 2016 1:05 AM