अत्यावश्यक सेवा म्हणून महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाचे १७०० कर्मचारी शनिवारी दिवसभरात कार्यरत होते. यात नियमितपणे ए, बी, सी, डी, ई या वार्डांसह शहराच्या विविध भागांची झाडलोट, डास प्रतिबंध औषध फवारणी, ड्रेनिज लाईन साफ करणे, जयंती नाल्यातील गाळ काढणे, आदी कामे करण्यात आली. विशेष म्हणजे वाहतुकीचा कोणताही अडथळा नसल्याने ही कामे वेगाने झाली. शहराच्या विविध भागातून रोज दोनशे टनांपेक्षा अधिक कचरा संकलन केले जाते. मात्र, लाॅकडाऊनमुळे त्यात घट होऊन दीडशे टन कचरा संकलित झाला. विशेष म्हणजे लक्ष्मीपुरी भाजी व धान्य बाजारपेठ, कपिलतीर्थ, महापालिका बाजारगेट, गंगावेश , राजारामपुरी, शाहूपुरी, आदी भाजीपाला बाजारपेठ बंद असल्यामुळे कचरा कमी प्रमाणात झाला. त्यामुळे कचरा संकलन कमी झाले. विशेष म्हणजे पावसाळ्यापूर्वीची काही कामेही आरोग्य विभागाने या दोन दिवसांच्या लाॅकडाऊन काळात हाती घेतली आहेत. यात जयंती नाला सफाई, चॅनेल गटारी सफाई, जयंती नाल्यास मिळणाऱ्या मोठ्या गटारी, आदींची स्वच्छतेचे काम युद्धपातळीवर घेण्यात आले. शनिवारी सर्वत्र लाॅकडाऊन असल्यामुळे रस्ते निर्मनुष्य असताना महापालिका कर्मचाऱ्यांनी आपले कर्तव्य इमानेइतबारे पार केल्याचे चित्र शहरात होते. त्यामुळे निर्मनुष्याबरोबरच रस्ते चकाचक झाले होते. आज,रविवारी लाॅकडाऊनच्या दुसरा दिवस असल्याने सर्वच दुकाने, आस्थापना पूर्णपणे बंद राहिल्यानंतर कचरा संकलनात आणखी घट होण्याची शक्यता आरोग्य विभागाकडून वर्तविली जात आहे.
कोट
इतर दिवसांपेक्षा लाॅकडाऊन काळात वेगाने स्वच्छतेची कामे झाली. आरोग्य विभागाचे १७०० कर्मचारी दिवसभरात बाजारातील झाडलोट, ड्रेनेज लाईन स्वच्छता, चॅनेल गटारी साफ करणे, आदी कामात व्यस्त होते. दुकाने, व्यापारी संस्था, उद्योग बंद असल्यामुळे नियमितपेक्षा ५० टन कचरा कमी संकलित झाला.
जयंत पवार, मुख्य आरोग्य निरीक्षक, कोल्हापूर महानगरपालिका