राजाराम लोंढेकोल्हापूर : भुदरगड नागरी सहकारी पतसंस्थेच्या ठेवीदारांना हळूहळू दिलासा मिळत असून अवसायक मंडळाने गेली पंधरा वर्षांत १ लाख ६९ हजार ठेवीदारांची १७१ कोटींची रक्कम परत केली आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ठेवीचे वाटप सुरू आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार २० हजार रुपयांपर्यंतच्या ठेवीचे वाटप सुरू असले तरी अवसायक मंडळाने सर्वच्या ठेवींच्या मुद्दलच्या १० टक्के रक्कम परत करण्याचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत २५५ कोटींपैकी ११५ कोटी कर्जाची वसुलीही झाली आहे.पुण्यातील ‘डीएसकेडीएल’ कंपनीच्या अवसायकांनी दीड हजार ठेवीदारांचे पैसे परत केले आहेत. त्या पार्श्वभूमीवर सहा जिल्ह्यांत ५२ शाखांच्या माध्यमातून विस्तार असलेल्या भुदरगड नागरी सहकारी पतसंस्थेवर २००७ मध्ये अवसायक मंडळ आले. त्यानंतर आतापर्यंत अवसायक मंडळाने न्यायालयाच्या आदेशास आधीन राहून वसुली व ठेवीदारांचे पैसे परत केले आहेत.
उच्च न्यायालयाने एकीकडे वसुलीची प्रक्रिया राबवत असताना पहिल्यांदा १० हजारांपर्यंत व नंतर २० हजारांपर्यंत ठेवीदारांचे पैसे परत करण्याचे आदेश दिले. त्यानुसार ‘केवायसी’ पूर्तता करून रक्कम घेऊन जाण्याचे आवाहन अवसायक मंडळाने केले. त्यानुसार २० हजारांपर्यंत रक्कम असलेल्या ८० टक्के ठेवीदारांनी रक्कम परत घेतली आहे. उर्वरित ठेवीदार आलेले नाहीत. त्यामुळे अवसायकांनी न्यायालयाची परवानगी घेऊन वीस हजारांवरील सर्वच ठेवीच्या मुद्दल रकमेपैकी १० टक्के परत करण्याचा निर्णय घेतला आहे.
डिसेंबर अखेर घेणे-देणे पूर्ण करावे लागणारमुळात अवसायक मंडळाची मुदत संपली आहे, पण उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांचे काम सुरू आहे. डिसेंबर २०२३ अखेर संपूर्ण घेणे-देणे पूर्ण करण्याच्या सूचना न्यायालयाच्या आहेत.
संस्था अडचणीत येण्यास ही आहेत कारणे :
- आर्थिक अनियमितता
- संचालक मंडळाचा गैरकारभार
- विना तारण मोठ्या कर्जांचे वाटप
संचालकांवर ४६ कोटींची जबाबदारी निश्चित
संस्थेवर अवसायक मंडळ आल्यानंतर कारभाराला जबाबदार असणाऱ्या संचालक मंडळावर जबाबदारीही निश्चित करण्यात आली. त्यानुसार संचालक व अधिकारी अशा ४८ जणांवर ४६ कोटींची जबाबदारी निश्चित केली असून त्यांच्याकडून वसुलीची प्रक्रियाही सुरू आहे.दृष्टिक्षेपात ‘भुदरगड’ पतसंस्था :
- स्थापना : १९७७
- कार्यक्षेत्र : कोल्हापूर, सातारा, पुणे, मुंबई, ठाणे, सांगली.
- शाखा : ५२
- अडचणीत आली : २००२
- अवसायक मंडळ नेमणूक : २००७
ठेवीदारांसाठी यांची चिकाटी : विभागीय सहनिबंधक अरुण काकडे, जिल्हा उपनिबंधक नीलकंठ करे, जिल्हा विशेष लेखापरीक्षक किरण पाटील, सहायक निबंधक प्रदीप मालगावे, सहायक निबंधक युसूफ शेख, व्यवस्थापक अनंत नाईक.