कोल्हापूर : पुणे विभागात जानेवारी महिन्यात विनातिकीट किंवा अनियमित प्रवास करणाऱ्या आणि सामान बुक न करता तसेच घेऊन जाणाऱ्या प्रवाशांकडून पुणे विभागातील मध्य रेल्वेने तब्बल १.७२ कोटी रुपयांची कमाई केली आहे.पुणे रेल्वे विभागात जानेवारीत तिकीट तपासणीसांनी १९,८५९ प्रवाशांना विनातिकीट प्रवास करताना पकडले. त्यांच्याकडून १.२६ कोटी रुपयांचा दंड वसूल केला आहे. याशिवाय अनियमित प्रवास करणाऱ्या ७,७६६ प्रवाशांकडून ४५.७५ लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे.
याच्या जोडीला सामान बुक न करता, तसेच घेऊन जाणाऱ्या १७६ प्रवाशांकडून २१,०६० रुपयांचा दंड वसूल केला आहे. ही कारवाई विभागीय रेल्वे व्यवस्थापक इंदूराणी दुबे यांच्या मार्गदर्शनाखाली तिकीट निरीक्षक आणि रेल्वे सुरक्षा दलाच्या मदतीने करण्यात आली.
रेल्वे प्रशासनाकडून सातत्याने तिकीट तपासणी मोहीम सुरू असते. प्रवाशांना विनंती आहे की, त्यांनी योग्य तिकीट घेऊनच प्रवास करावा, अन्यथा त्यांना रेल्वे कायद्याअंतर्गत दंड भरावा लागेल. दंड न भरल्यास तुरुंगवासही होऊ शकतो. -डॉ. मिलिंद हिरवे, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक, मध्ये रेल्वे.