कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे (गोकुळ) १८ संचालक रविवार (दि. १२)पासून १० दिवस परदेश दौऱ्यावर निघाले आहेत. इंडोनेशिया, सिंगापूर देशांना भेटी देणार असून, विशेषकरून इंडोनेशियामधीलदूध व्यवसाय व तेथील तंत्रज्ञानाच्या अभ्यासाचे नियोजन त्यांनी केले आहे. संघाच्या संचालकांचा हा व्यक्तिगत दौरा आहे. दौऱ्यासाठी येणारा खर्च संचालक स्वत: करणार आहेत. तेवढ्या रकमेचे धनादेशही संचालकांकडून घेतल्याचे समजते. ‘गोकुळ’वर कोणत्याही प्रकारचा बोजा पडणार नसल्याचे सांगण्यात आले.जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक जून महिन्यात युरोप दौऱ्यावर गेले होते. त्यानंतर ‘गोकुळ’च्या संचालक मंडळातही परदेश दौऱ्याबाबत चर्चा झाली होती. मात्र, आगामी विधानसभा निवडणुकीची सर्वच संचालकांवर जबाबदारी होती. त्यामुळे विधानसभा निवडणुकीनंतर दौरा करण्याचे नियोजन केले होते. त्यानुसार, ऑस्ट्रेलियाला जाण्याबाबत काही संचालक आग्रही होते. मात्र, ज्येष्ठ संचालकांनी त्याला संमती दिली नाही. इंडोनिशिया, सिंगापूर या देशांना भेट देण्याचा निर्णय झाला. त्यानुसार गेले महिनाभर सगळी तयारी सुरू आहे.संघाचे २४ संचालक आहेत, मात्र यांपैकी सहाजण जाणार नसल्याचे समजते. त्यामुळे १८ संचालकच दौऱ्यावर जाणार आहेत. इंडोनेशियामध्ये दूधव्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो. तेथील व्यवसाय आणि त्यातील नवतंत्रज्ञानाचा अभ्यास करणे हा त्यामागील हेतू आहे. रविवारी कोल्हापुरातून रवाना होणार असून, २२ जानेवारी रोजी ते परत येणार आहेत. सहा संचालकांनी दौऱ्यावर जाण्यास नकार दिल्याचे समजते.
Kolhapur: ‘गोकुळ’चे संचालक स्वखर्चातून इंडोनेशियाला जाणार, दूध व्यवसाय व तेथील तंत्रज्ञानाच्या अभ्यास करणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2025 13:07 IST