गांधीनगर : रेल्वे पोलिसांत भरती करतो, असे सांगून संगनमताने उचगाव (ता. करवीर) येथील दोघांची १८ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी उदय एकनाथ नीळकंठ (मूळ रा. मंगेश्वर कॉलनी, उचगाव, जि. कोल्हापूर, सध्या रा. कोगनोळी, ता. कवठेमहांकाळ, जि. सांगली), गोविंद गंगाराम गुरव व नवनाथ उर्फ यशवंत जगन्नाथ गुरव (दोघेही रा. चोपडेवाडी, ता. भिलवडी, जि. सांगली) या तिघांवर गांधीनगर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्रीधर शिवाजी शिंदे व दीपक जयसिंग अंगज (रा. सावंत गल्ली, उचगाव) अशी फसवणूक झालेल्या तरुणांची नावे आहेत.अधिक माहिती अशी की, शिंदे व अंगज कुटुंबीय उचगाव येथे शेजारीच वास्तव्यास होते. उदय नीळकंठ त्यांच्या शेजारीच राहावयास होता. उदयला दीपक अंगज आणि श्रीधर शिंदे हे दोघे तरुण रेल्वे पोलिस भरतीसाठी प्रयत्न करत असल्याची माहिती होती. उदय याने माझे मामा गोविंद गुरव व नवनाथ गुरव यांची पोलिस आणि रेल्वे पोलिसांच्या अधिकाऱ्यांची चांगली ओळख आहे. त्यांनी अनेकांना नोकरी लावली असल्याचे सांगितले.
दरम्यान, श्रीधर शिंदे यांनी २४ मार्च ते २३ एप्रिल या कालावधीत आठ लाख रुपये आरटीजीएस व गुगल पेद्वारे गोविंद गुरव यांच्या खात्यावर पाठवले. तसेच दीपक अंगज यांनी लक्ष्मीपुरीतील बँकेच्या शाखेतील आपल्या खात्यातून दहा लाख आरटीजीएस व गुगल पेद्वारे या तिघा आरोपींना मार्च २०२१ मध्ये दिले. या कालावधीला बरेच दिवस उलटले परंतु या तिघांनी भरती प्रक्रियेबाबत उडवाउडवीची उत्तरे दिली.वारंवार तगादा लावूनही पोलिस भरती करण्यासाठी टाळाटाळ करत असल्याचे लक्षात आले. त्यानंतर पोलिस तक्रार करणार म्हटल्यानंतर त्यांनी स्वतःचे चेक अदा करून सिक्युरिटीसाठी हे ठेवा, असे सांगितले. तुमचे काम झाले की हे परत द्या, असे सांगून वेळ मारून नेली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर दीपक अंगज यांनी गांधीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.त्यानुसार उदय नीळकंठसह तिघांवर संगनमताने फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणातील संशयित फरार झाले असून, त्यांचा शोध सुरू आहे. अधिक तपास सहायक फौजदार सुभाष सुदर्शनी करत आहेत.