कोल्हापूर : राष्ट्रीय फेरीवाला धोरणानुसार शहरातील सर्व फेरीवाल्यांसाठी सर्वेक्षणानंतर फेरीवाला झोन निश्चित केलेले आहेत. त्या झोनमध्ये फेरीवाल्यांनी आज, शुक्रवारपासून स्थलांतरित होऊन व्यवसाय करण्याची अंमलबजावणी करण्यात येत आहे, पण जे ‘ना फेरीवाला झोन’मध्ये व्यवसाय करतील त्यांच्यावर सोमवार (दि. ४)पासून अतिक्रमण विभागाच्या वतीने कारवाई करण्यात येणार आहे. अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यासाठी शहरातील १८ ठिकाणे महापालिकेने निश्चित केली आहेत. ही मोहीम १९ जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहे. दरम्यान, महापालिकेच्या या मोहिमेबद्दल चर्चा करण्यासाठी सर्वपक्षीय फेरीवाला कृती समितीच्यावतीने दुपारी अडीच वाजता महाराणा प्रताप चौक येथे बैठकीचे आयोजन केले आहे. त्यामध्ये माजी महापौर आर. के. पोवार, कॉ. दिलीप पवार, रघुनाथ कांबळे आदी मार्गदर्शन करणार आहेत. त्यानंतर दुपारी ४ वाजता हे सर्वपक्षीय फेरीवाले कृती समितीच्यावतीने महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांची भेट घेऊन चर्चा करणार आहेत. फेरीवाला धोरणांतर्गत फेरीवाल्यांचे सर्वेक्षण आणि पुनर्वसनासाठी शहर फेरीवाला समिती स्थापन केली. त्यांना ओळखपत्रे दिली आहेत. पुनर्वसनांतर्गत जाहीर केलेल्या फेरीवाले झोन व ‘ना फेरीवाले झोन’ यांची यादी वेबसाईटवर जाहीर केली आहे. त्यानुसार आज, शुक्रवारपासून ह्या मंजूर फेरीवाले झोन धोरणाची अंमलबजावणी होत आहे. त्यानुसार फेरीवाल्यांनी व्यवसाय नमूद फेरीवाले झोनच्या ठिकाणी करण्याचा आहे; पण सोमवार (दि.४ जानेवारी)पासून ‘ना फेरीवाले झोन’मधील फेरीवाल्यांवर अतिक्रमणाची कारवाई करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)पहिली कारवाई नाट्यगृहाशेजारी खाऊ गल्लीतअतिक्रमण हटाव मोहिमेची सुरुवात केशवराव भोसले नाट्यगृहाशेजारील खाऊ गल्लीतून करण्यात येणार आहे. कारण येथे अधिकृत ६३ परवानाधारक केबिन्स असल्या तरी तेथे सद्य:स्थितीत सुमारे ९० हून अधिक केबिन्स आहेत. त्या वाढविण्यात एका आमदारांच्या राजाश्रयातील माजी नगरसेवकाचा हात असल्याचेही जगजाहीर आहे. एस.टी. स्टँड परिसरात २५६ परवानाधारक निश्चित केले असले तरी त्यांचे जेम्स स्टोन इमारतीत स्थलांतरितचा निर्णय यापूर्वीच झाला आहे, पण या केबिन्सधारकांचे पुनर्वसन केलेले नाही; पण सध्या या ठिकाणी ३०० हून अधिक फेरीवाल्यांची संख्या वाढली असून आता वाढीव फेरीवाल्यांनाही मंजुरी द्यावी, अशीही मागणी फेरीवाल्यांनी महापालिकेकडे केली आहे.
शहरातील १८ ठिकाणची अतिक्रमणे हटविणार
By admin | Published: January 01, 2016 12:21 AM