इचलकरंजी : गणेशमूर्ती विसर्जनासाठी येथील शहापूर खणीमध्ये असलेला तराफा उलटल्याने आमदार सुरेश हाळवणकर, अतिरिक्त पोलिस अधीक्षक डॉ. दिनेश बारी, पोलिस उपअधीक्षक विनायक नरळे, नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ, आदींसह १८ जण पाण्यात पडले. सुदैवाने खणीच्या काठावर असलेल्या व्हाईट आर्मी, पोलिस व स्थानिकांनी या सर्वांना वाचविले.इचलकरंजी येथील पाणी प्रदूषित होऊ नये यासाठी इचलकरंजी नगरपालिकेने शहापूर येथे खणीतील पाण्यामध्ये गणेशमूर्ती विसर्जनाची सोय केली आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे व घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन खणीमध्ये करावे, असे आवाहन आमदार हाळवणकर व मुख्याधिकारी डॉ. रसाळ यांनी दोन दिवसांपूर्वी केले होते. शनिवारी घरगुती श्री विसर्जनाच्या निमित्ताने आमदार हाळवणकर हे त्यांचे बंधू व मुलांसह खणीवर आले. त्या ठिकाणी मूर्ती विसर्जनासाठी असलेल्या प्लास्टिकच्या बॅरेल तराफ्यावरून खणीमध्ये आमदारांच्या घरातील मूर्ती विसर्जित करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी आमदार हाळवणकर, अतिरिक्त पोलिस अधीक्षक बारी, उपअधीक्षक नरळे, मुख्याधिकारी डॉ. रसाळ, नगरपालिकेचे आरोग्यधिकारी डॉ. सुनीलदत्त संगेवार, पोलिस निरीक्षक सतीश पवार, नगरसेवक भाऊसो आवळे, आमदारांचे बंधू महादेव, मुले विपुल व वैभव तसेच व्हाईट आर्मीचे काहीजण असे मिळून १८ जण तराफ्यावर चढले. तराफ्यावर अधिक वजन झाल्यामुळे तो एका बाजूला कलला. म्हणून व्हाईट आर्मीच्या एका कार्यकर्त्याने तराफा वर उचलून पाण्यात ढकलला. या प्रयत्नात तराफा पुढे जाऊन आणखीन कलला व पाण्यात उलटला. तराफ्यावरील सर्वजण पाण्यात पडले.अचानकपणे झालेल्या या दुर्घटनेमुळे चांगलाच गोंधळ उडाला. घटनेचे गांभीर्य लक्षात येताच घाटावर उपस्थित प्रत्येकाने एकमेकांच्या साहाय्याने व व्हाईट आर्मी जवानांच्या सहकार्याने पाण्यात पडलेल्या सर्वांना सुखरुप बाहेर काढले. घटनेची माहिती मिळताच खण परिसरात नागरिकांची गर्दी होऊ झाली होती. यापैकी मुख्याधिकारी डॉ. रसाळ यांच्या पोटात पाणी गेल्यामुळे त्यांना आयजीएम रुग्णालयात हलविले. मात्र, त्यांची प्रकृती गंभीर झाल्यामुळे त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. (प्रतिनिधी)दिनेश बारी यांना निरीक्षकांनी वाचविलेतराफा उलटताच त्यावरील अतिरिक्त पोलिस अधीक्षक बारी हे पाण्यात बुडाल्यामुळे त्यांना वाचविण्यासाठी पोलिस निरीक्षक पवार यांनी जोरदार प्रयत्न करून त्यांना काठावर आणले, तर आमदार हाळवणकर यांनी मुख्याधिकारी डॉ. रसाळ यांना आधार देत पाण्याबाहेर काढले.खणीत गणपती विसर्जन करण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहन मिळावे यासाठी शनिवारी मी माझ्या घरातील गणेश विसर्जन शहापूर येथील खणीत करण्याचा निर्णय घेतला. मात्र, तराफ्यावर जास्त गर्दी झाल्यामुळे तराफा उलटला. सुदैवाने या दुर्घटनेत कोणीही जखमी झाले नाही. माझ्यासह बंधू महादेव, मुले वैभव व विपुल, पुतण्या महेश यांच्यासह मुख्याधिकारी प्रशांत रसाळ, अतिरिक्त पोलिस अधीक्षक दिनेश बारी, पोलिस उपअधीक्षक विनायक नरळे, नगरसेवक भाऊसो आवळे, पोलिस निरीक्षक सतीश पोवार व कार्यकर्ते सर्वजण सुरक्षित आहेत. मी नियमित पोहत असल्याने स्वत:सह इतरांना आधार देत बाहेर आणले. सर्वांच्या सदिच्छा आणि गणपती बाप्पांचे आशीर्वाद यामुळे आमच्या जीवनाची दोर बळकट आहे. - सुरेश हाळवणकर, आमदार
इचलकरंजीत आमदारांसह १८ बचावले
By admin | Published: September 11, 2016 1:11 AM