कोल्हापूर : महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी तयार केलेल्या प्रारूप मतदार याद्यांत प्रचंड गोंधळ झाला असून कर्मचारी, अधिकाऱ्यांनी केलेली कामे सदोष असल्याचे उघड झाले आहे. हरकती घेण्याची मुदत मंगळवारी संपली तेव्हा ८१ प्रभागांतील प्रारूप मतदार याद्यांवर तब्बल १८०० इतक्या प्रचंड प्रमाणात हरकती दाखल झाल्या असल्याने पुढील सात दिवसांत त्या दुरुस्त करण्याचे एक मोठे आव्हान प्रशासनासमोर आहे.महापालिका प्रशासनाने तयार केलेल्या प्रारुप मतदार याद्या दि. १६ फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध केल्या तेव्हापासून अनेक प्रभागांतील याद्या सदोष झाल्याची बाब प्रत्येक दिवशी समोर येत होती. बीएलओ यांनी जागेवर जाऊन प्रत्यक्ष खात्री करून घेतली नसल्याची मुख्य तक्रार उमेदवार व त्यांचे कार्यकर्ते करत आहेत परंतु प्राप्त झालेल्या अनेक हरकती या दुबार असल्याचे, एकच प्रकरणाशी संबंधित हरकती या तीन ते चार व्यक्तींनी केल्या असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. काहींनी प्रतिस्पर्धी उमेदवारांना त्रास देण्यासाठी म्हणून हरकती दिल्या असल्याचा संशयही प्रशासनाने व्यक्त केला आहे.मंगळवारी एका दिवसात ८८८ हरकती दाखल झाल्या आहेत. प्रत्यक्षात हरकतींची संख्या जास्त असली तरी त्या दुरुस्त करण्याचे आव्हान प्रशासनाने स्वीकारले असून दिवस-रात्र बसून याद्या दुरूस्त केल्या जातील, असे उपायुक्त रविकांत आडसुळे व निखिल मोरे यांनी सांगितले. जशा हरकती येत होत्या तसे त्याची खातरजमा करून निकालीही काढण्यात येत होत्या. आतापर्यंत किमान ४०० ते ४५० हरकतींवर निर्णयही घेतला असल्याचे आडसुळ यांनी सांगितले.दाखल झालेल्या हरकती घेऊन बीएलओ आता प्रत्यक्ष प्रभागात जागेवर जाऊन तपासणी करत आहेत. गल्ली क्रमांक, घरांचे कम्रांक, चौकांची माहिती घेत आहेत. त्यानंतर कनिष्ठ अभियंता प्रभागाच्या नकाशांनुसार मतदार याद्या दुरुस्त करण्याचे काम करत आहेत. दि. २ मार्चअखेर हे काम पूर्ण करून अंतिम मतदार याद्या या दि. ३ मार्चला प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. याद्या दुरुस्त करण्यासाठी वेळ वाढवून दिली जाणार नाही, राज्य निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या वेळेत त्या दुरुस्त केल्या जातील, असे आडसूळ यांनी सांगितले.विभागीय कार्यालय प्राप्त हरकतींची संख्या
- गांधी मैदान ४९९
- शिवाजी मार्केट ६२७
- राजारामपुरी ३६४
- ताराराणी मार्केट ३१०
- एकूण हरकती - १८००