आॅनलाईन लोकमत
कोल्हापूर, दि. १३ : ‘क्रिडाई कोल्हापूर’ या बांधकाम व्यावसायिकांच्या संघटनेची २०१७-२०१९ साठीची पंचवार्षिक निवडणूक जाहीर झाली आहे. २१ मे रोजी ही निवडणूक होत आहे. शनिवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्याच दिवशी १९ उमेदवारी अर्ज दाखल झाले. रविवारीही अर्ज दाखल करण्याची मुदत आहे.
निवडणूक अधिकारी म्हणून अॅड. विवेक घाटगे हे काम पाहत आहेत. ‘क्रिडाई कोल्हापूर’ संघटनेच्या एकूण १७ संचालक पदांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. संघटनेची १२७ सभासद संख्या आहे. संघटनेची गतवेळची निवडणूक बिनविरोध झाली होती. यंदाही ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी ज्येष्ठांचे प्रयत्न सुरू आहेत; पण यंदाही या संघटनेवर संचालक म्हणून जाण्यासाठी सदस्यांमध्ये चढाओढ आहे. शनिवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी १९ उमेदवारी अर्ज दाखल झाले. तर रविवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत आहे.
उमेदवारी अर्जांची छाननीची प्रक्रिया सोमवारी सकाळी अकरा वाजता होईल. त्यानंतर दुपारी दोन वाजता ‘क्रिडाई कोल्हापूर’च्या कार्यालयात पात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येईल. मंगळवारी (दि. १६) दुपारी दोन वाजेपर्यंत माघारीची मुदत आहे. यादिवशी सायंकाळी पाच वाजता उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. दि. २१ मे (रविवारी) रोजी सकाळी नऊ ते दुपारी दोन या वेळेत ‘क्रिडाई कोल्हापूर’च्या कार्यालयात मतदान होणार आहे. दुपारी तीन वाजता मतमोजणी आणि निकाल जाहीर होईल. निवडून आलेल्या १७ संचालकांमधून अध्यक्ष, उपाध्यक्ष, सेक्रेटरी यांची निवड करण्यात येणार आहे.