कोल्हापूर : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सुरू असलेल्या उपाययोजनांचा भाग म्हणून गेल्या दोन दिवसांत कोल्हापूर महानगरपालिकेच्या पथकांनी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १९९ व्यक्तींवर कारवाई करून ३४ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल केला. मंगळवारपासून तर १०० रुपयांऐवजी ५०० रुपये दंड आकारला जात आहे.
महानगरपालिका, केएमटी आणि पोलीस यांच्या संयुक्त पथकांनी ही कारवाई केली. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्कचा वापर करणे, सामाजिक अंतर ठेवणे, हॅण्डग्लोज वापरणे, सार्वजनिक ठिकाणी न थुंकणे, या प्रतिबंधक गोष्टींचे पालन करायचे आहे. मात्र, शहरात त्याचे उल्लंघन होत आहे. सोमवारी विनामास्क फिरणाऱ्या व्यक्तींकडून १९ हजार १००, सोशल डिस्टन्स न ठेवणाऱ्या आठ व्यक्तींकडून १५ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला आहे.
तसेच महापालिकेच्या अग्निशमन विभागाकडून शहरातील २० हॉलची तपासणी करण्यात आली. यावेळी कसबा बावडा, लाइन बझार, आयसोलेशन रोड, फुलेवाडी रिंगरोड, प्रतिभानगर, ताराबाई पार्क येथील मंगल कार्यालयांना १२ हजार रुपयांचा दंड करण्यात आला.
शहरामध्ये गर्दी वाढत असल्याने नागरिकांनी दक्षता घेणे आवश्यक आहे. सण, समारंभ, धार्मिक स्थळे, भाजी मार्केट याठिकाणी नागरिकांनी नियमितपणे मास्कचा वापर करावा, सॅनिटायजरचा वापर करावा तसेच सामाजिक अंतराचे पालन करावे, असे आवाहन महापालिका प्रशासक कादंबरी बलकवडे यांनी केले आहे.