लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : महिला बचत गटांच्या उत्पादनांसाठीची तालुका विक्री केंद्रे गेली काही वर्षे दुर्लक्षित असून आता येथील फर्निचर आणि किरकोळ कामांसाठी २ कोटी ३६ लाख रुपयांची ग्रामविकास विभागाकडे मागणी करण्यात आली आहे.
२०११ पासून या केंद्रांना मंजुरी मिळाली. जागा न मिळाल्याने काही तालुक्यात उशिरा परवानगी मिळाली; परंतु या जागा निवडताना या केंद्रांमधून खरोखरच वस्तू विकल्या जातील का याचा फारसा विचार झाला नाही. परिणामी ही महत्त्वाकांक्षी योजना दुर्लक्षित राहिली.
कागल येथील केंद्राचे काम १६ ऑगस्ट २०१३ रोजी पूर्ण झाले. मात्र, किरकोळ कामासाठी त्याचे उद्घाटन व्हायला फेब्रुवारी २०२१ उजाडले. हातकणंगलेत ५० लाख खर्च झाले असून,कामे अपूर्ण आहेत. इमारत उघडली गेलेली नाही. गडहिंग्लजला ४४ लाख रुपये खर्च झाले. याआधीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी समाजाच्या सहभागातून ३५ लाख रुपयांची कामे या केंद्रांवर केली; परंतु विक्री केंद्र बंदच आहे. पन्हाळा तालुक्याचे केंद्र बाजारभोगाव येथे बांधण्यात आले असून, तेथेही विक्री सुरू नाही. आजऱ्यातही ५० लाख खर्चूनही इमारत बंद आहे. चंदगड तालुक्यातील तुर्केवाडी येथे ६ फेब्रुवारी २०१४ साली काम पूर्ण झाले; पण तेथेही विक्री सुरू नाही. गगनबावड्याचीही कामे अपूर्ण असून, तेथेही इमारत बंद आहे.
कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या मुख्यालयाच्या ठिकाणी ५० लाख रुपये मंजूर करण्यात आले होते. मात्र, जागा नसल्याने २८ ऑगस्ट २०१४ ला ते पैसे परत पाठविण्यात आले. शिरोळ तालुक्यातील दानोळी येथे केंद्र उभारण्यासाठी १३ नोव्हेंबर २०१७ रोजी ग्रामविकास विभागाने मान्यता दिली आहे. राधानगरी, भुदरगड, करवीर आणि शाहूवाडी या तालुक्यांमध्ये विक्री केंद्रे उभारण्यासाठी जागा नसल्याने प्रस्ताव रद्द झाले.
मात्र, या सातही केंद्रांवर जी किरकोळ कामे राहिली आहेत ती पूर्ण करण्यासाठी आणि फर्निचरसाठी २ कोटी ३६ लाख रुपये लागणार आहेत. हा प्रस्ताव आता ग्रामविकास विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांकडे पाठविण्यात आला आहे.
.......................................
दोनदा उद्घाटन झाले; परंतु..
आजऱ्याच्या विक्री केंद्राचे दोनवेळा उद्घाटन झाले. सुरुवातीला काही दिवस महिला आपल्या बचत गटांची उत्पादने घेऊन विक्रीसाठी बसल्या; परंतु ग्राहकांअभावी नंतर ही विक्री बंद पडली.
..............................
कोट
कोल्हापूर जिल्ह्यातील सात विक्री केंद्रांच्या कामांचा आढावा घेतला आहे. काही किरकोळ कामे शिल्लक आहेत आणि येथे फर्निचर आवश्यक आहे. मागणी केलेला निधी आल्यानंतर ही केंद्रे सुसज्ज करून महिलांना बचत गटांच्या उत्पादन विक्रीसाठी उपलब्ध करून दिली जातील.
डॉ. रवी शिवदास
प्रकल्प संचालक, ग्रामीण विकास यंत्रणा, जिल्हा परिषद कोल्हापूर
१८०३२०२१ कोल आजरा
स्वर्णजयंती ग्रामस्वरोजगार योजनेतील आजरा येथे बंद असलेले तालुका विक्री केंद्र
डॉ. रवी शिवदास