शिरोळ : बांधकाम परवाना देण्यासाठी पावणेदोन लाख रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी शिरोळच्या मुख्याधिकाऱ्यासह चौघांना अटक करण्यात आली. नगरपालिकेतच लाचलुचपत विभागाच्या पथकाने सापळा रचून सोमवारी सायंकाळी ही कारवाई केली.
मुख्याधिकारी अभिजित मारुती हराळे (वय ३३, सध्या रा. शिरोळ, मूळ गाव भिलवडी, ता. पलूस, जि. सांगली), कनिष्ठ अभियंता संकेत हणमंत हंगरगेकर (२८, सध्या रा. जयसिंगपूर, मूळ गाव उस्मानाबाद), लिपिक सचिन तुकाराम सावंत (४२, रा. शिरोळ) व खासगी व्यक्ती अमित तानाजी संकपाळ (४२, रा. शिरोळ) या चौघांवर एकाचवेळी कारवाई झाल्याने खळबळ उडाली.याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांनी बांधकाम परवाना मिळविण्यासाठी प्रस्ताव दिला होता. तो तपासून पुढे पाठविण्यासाठी संकेत हंगरगेकर व सचिन सावंत या दोघांनी एक लाखाच्या लाचेची मागणी केली होती. शिवाय, मुख्याधिकारी अभिजित हराळे यांनी हा प्रस्ताव मंजूर करून बांधकाम परवाना देण्यासाठी ७५ हजारांची लाच मागितली होती.
याबाबत तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. तिघांनी खासगी व्यक्ती अमित संकपाळ याला लाच स्वीकारण्यासाठी सांगितले होते. त्यानुसार संकपाळ याला लाच स्वीकारल्यानंतर पथकाने रंगेहात पकडले. पालिकेतच घडलेल्या या घटनेनंतर खळबळ उडाली. शुक्रवारी (दि. २४) लाचलुचपत विभागाने पडताळणी केली होती.
त्यानंतर सोमवारी ही कारवाई केली. या कारवाईत पोलिस उपअधीक्षक सरदार नाळे, पोलिस निरीक्षक नितीन कुंभार, कर्मचारी संजीव बंबरगेकर, विकास माने, मयूर देसाई, रूपेश माने, विष्णू गुरव यांनी सहभाग घेतला.शिरोळमधील पहिली मोठी कारवाईमूळचे भिलवडी (ता. पलूस) येथील रहिवासी असलेले मुख्याधिकारी अभिजित हराळे यांनी पाच महिन्यांपूर्वी शिरोळ पालिकेचा पदभार स्वीकारला होता. शहराच्या विकास आराखड्यावरून कृती समितीने त्यांना धारेवर धरले होते. नव्यानेच पाच महिन्यांपूर्वी रूजू झालेले मुख्याधिकारी लाचलुचपतच्या जाळ्यात अडकल्याने पालिकेचा कारभार चव्हाट्यावर आला आहे. शिवाय, या कारवाईने शिरोळ शहर चर्चेत आले आहे.पालिकेत दिवसभर गर्दीसोमवारी सकाळी अर्थसंकल्प सभा, त्यानंतर सर्वसाधारण सभा झाली. सभेनंतर महिला बालकल्याण विभागांतर्गत प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटनदेखील झाले. यावेळी मुख्याधिकारी हराळे यांची उपस्थिती होती. दिवसभर पालिकेत गर्दी होती. अचानक पावणेपाचच्या सुमारास पथकाने कारवाई करून आपली मोहीम यशस्वी केली.