गांधीनगर : कोरोना संकटामुळे केलेल्या संचारबंदीत पश्चिम महाराष्ट्रातील प्रसिद्ध असणाऱ्या गांधीनगर बाजारपेठेतील सर्वच व्यवहार गत १५ दिवसांपासून पूर्णत: बंद आहेत. त्यामुळे येथील बाजारपेठेतील दररोजची तब्बल पंधरा ते वीस कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल ठप्प झाली आहे. बंद झाली आहे.
पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटकातील सर्वांत मोठी बाजारपेठ असा गांधीनगर बाजारपेठेचा लौकिक आहे. लग्नसराई आणि सणासुदीला या बाजारपेठेत ग्राहकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते; पण महाराष्ट्र शासनाने वाढत्या कोरोना संसर्गामुळे लाॅकडाऊन केल्याने या व्यापारपेठेची आर्थिक उलाढाल ठप्प झाल्याने व्यापारी चिंताग्रस्त आहेत. अनेकांनी कर्जे काढून व्यवसाय सुरू केला होता. मात्र, नेमके त्याचवेळी दुकाने बंद ठेवण्याची वेळ आल्याने ते कर्जाच्या खाईत लोटले गेले आहेत. व्यवसायात मंदी, भरमसाठ दुकानगाळ्यांचे भाडे या सर्वांचा सारासार विचार करता व्यापाऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. गतवर्षीही या बाजारपेठेला कोरोना महामारीचा फटका बसला होता. गतवर्षीच्या लॉकडाऊननंतर या बाजारपेठेने हळूहळू उचल खाल्ली होती. ग्राहकांची रेलचेल नुकतीच वाढली होती. गुढीपाडव्यापूर्वी लग्नाचे मुहूर्त कमी असल्याने ग्राहकांची गर्दी मंदावली होती. लग्नसराईची खरेदी सुरू होणार इतक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने शासनाने सुरुवातीला कडक निर्बंध केले. त्यानंतर ‘ब्रेक द चेन’ या निर्बंधानुसार बाजारपेठेत बंदसदृश परिस्थिती सुरू झाली. ‘अत्यावश्यक सेवा’वगळता इतर सर्व व्यवसाय पुन्हा बंद करण्याची वेळ व्यापाऱ्यांवर आली. त्यामुळे दररोज सुमारे पंधरा कोटी रुपयांची उलाढाल असणारी बाजारपेठ ठप्प झाली आहे. या बंदकाळाचा फटका बाजारपेठेत काम करणारे कामगार, ट्रान्सपोर्ट व्यावसायिक तसेच छोटे-मोठे व्यावसायिकांना बसला आहे.
चौकट : देणी थकल्याने अनेकांनी सोडले गाव
मागील वर्षीच्या लॉकडाऊनमध्ये काही दुकानमालकांनी भाडेवसुली केल्यामुळे या बाजारपेठेत बरीचशी दुकाने बंद झाली होती. काही व्यापाऱ्यांनी तर दुकानभाडे, कामगार पगार, व्यापाऱ्यांची देणी भागविणे शक्य न झाल्याने रातोरात कुटुंबीयांना घेऊन पलायन केल्याच्या बऱ्याच घटना डिसेंबर-जानेवारीमध्ये घडल्या आहेत.
चौकट :
कामगारही खचले
काही व्यापाऱ्यांनी मागील लॉकडाऊनमध्ये कामगार पगारात कपात केल्याने बहुतांश कामगारांनी औद्योगिक वसाहतीमध्ये काम शोधले. परंतु आताच्या लॉकडाऊनमध्ये औद्योगिक वसाहतीसुद्धा बंद झाल्याने कामगारवर्गावर हलाखीची परिस्थिती आली आहे. दुकानभाडे, कामगार पगार, लाईटबिल, ग्रामपंचायत फाळा, जीएसटी यासह इतर सर्वप्रकारचे खर्च सुरू असताना उत्पन्नाचे मार्ग थांबले आहेत. बंदसदृश परिस्थितीमुळे व्यापारपेठ अडचणींमध्ये आली आहे.
फोटो : ३०
ओळ : कोरोना महामारीच्या वाढत्या संसर्गामुळे पश्चिम महाराष्ट्रात प्रसिद्ध असणाऱ्या गांधीनगर व्यापारी मार्केटमध्ये असा शुकशुकाट आहे.