कोल्हापूर : कोल्हापूर परिक्षेत्रातील ४७ मतदारसंघांत ३६ तपासणी नाके आहेत. तपासणी नाक्यांसह भरारी पथकांनी आचारसंहिता काळात संशयास्पद रोकड, अवैध दारू, गांजा, मौल्यवान धातू आणि गुटखा असा सुमारे २० कोटींचा मुद्देमाल जप्त केला. २४ हजार संशयितांवर प्रतिबंधात्मक कारवाया केल्याची माहिती विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी बुधवारी (दि. १३) पत्रकार परिषदेत दिली.निवडणूक काळात बेकायदेशीर दारूची निर्मिती, वाहतूक, विक्री होऊ नये तसेच संशयास्पद वस्तूंची वाहतूक होऊ नये, यासाठी पोलिसांनी विशेष खबरदारी घेतली आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांच्या सीमेवर कोल्हापूर, सांगली, सोलापूर ग्रामीण परिसरात तपासणी नाके २४ तास कार्यरत आहेत. अमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी श्वान पथकांची मदत घेतली जात असल्याची माहिती फुलारी यांनी दिली.
सोने, चांदी, गांजा, दारू जप्त
- मौल्यवान धातू - ७ कोटी ५७ लाख
- (सोने - ९ किलो, चांदी ६० किलो)
- रोकड - ६ कोटी ६४ लाख
- दारू - २ कोटी ८३ लाख
- गुटखा - १ कोटी ८७ लाख
- गांजा - २२ लाख २४ हजार (११३ किलो)
सराईतांवर प्रतिबंधात्मक कारवायापरिक्षेत्रातील २४ हजार ४७ सराईतांवर पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाया केल्या आहेत. झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यांतर्गत दोघांवर कारवाई केली. तर मोक्कांतर्गत सात जणांवर कारवाई केली. १५ ऑक्टोबर ते १२ नोव्हेंबरदरम्यान २३ पिस्तूल आणि ३६ काडतुसे पोलिसांनी जप्त केली.
आचारसंहिता भंगाचे २५ गुन्हे
जिल्हा - दखलपात्र गुन्हे - अदखलपात्र गुन्हे
- कोल्हापूर - ३ - ९
- सांगली - १ - २
- सोलापूर ग्रामीण - १ - १
- पुणे ग्रामीण - ५ - ३
- एकूण - १० - १५
सशस्त्र दलांचा बंदोबस्तमतदान आणि मतमोजणी काळात बंदोबस्तासाठी स्थानिक दोन हजार पोलिस आणि एक हजार होमगार्डसह सीआरपीएफ, बीएसएफ, सीआयएसएफ, आयटीबीपी, एसएसबी, राज्य राखीव दल, हरयाणा येथील राखीव दलाच्या एकूण ३० कंपन्या, म्हणजे ३ हजार जवान उपलब्ध होणार आहेत. गुजरात आणि कर्नाटकातून १० हजार होमगार्ड बंदोबस्तासाठी परिक्षेत्रात येणार आहेत.
निवडणूक काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पुरेपूर खबरदारी घेतली आहे. पोलिसांच्या सूचनांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाया केल्या जात आहेत. निर्भय वातावरणात मतदारांनी उत्स्फूर्तपणे मतदान करावे. - सुनील फुलारी, विशेष पोलिस महानिरीक्षक