कोल्हापूर - संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह आहे तसे पुन्हा बांधण्यासाठी कलावंत आणि प्रेक्षकांच्या इच्छेनुसार युद्धपातळीवर प्रयत्न केले जातील, असे सांगून लोकभावनेचा आदर करून राज्य सरकार २० कोटी रुपयांचा निधी देत आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी केली.
शिंदे यांनी शनिवारी सायंकाळी केशवराव भोसले नाट्यगृहाच्या जळालेल्या भागाची पाहणी केली. त्यांच्यासोबत पालकमंत्री हसन मुश्रीफ, उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, जिल्हाधिकारी अमोल येडगे, राज्य कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर, आमदार प्रकाश आबिटकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अभियंता कार्तिकेयन, आयुक्त के. मंजूलक्ष्मी, माजी आमदार चंद्रदीप नरके, भाजप नेत्या चित्रा वाघ, सत्यजीत कदम, शौमिका महाडीक, आदिल फरास आदी उपस्थित होते.
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या काळात बांधलेले कोल्हापुरातील ऐतिहासिक संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाला लागलेली आग दुर्दैवी आहे. या वास्तूशी जिव्हाळ्याचे नाते असलेल्या अनेक कलांवत, आर्किटेक्चर आणि प्रेक्षकांनी हे नाट्यगृह जसे होते तसे बांधण्याची इच्छा माझ्याजवळ व्यक्त केली. अशा प्रकारचे भव्य नाट्यगृह बांधण्यासाठी जिल्हाधिकारी आणि आयुक्तांनी २५ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक सुचविले आहे. त्यांच्या भावनेचा आदर करून २० कोटींचा निधी तातडीने जाहीर करत आहे, तसेच विम्याच्या रकमेतून ५ कोटी रुपये महापालिका प्रशासनाला मिळतील, असेही त्यांनी सांगितले.
दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी
नाट्यगृहाला आग कशी लागली? या दुर्घटनेची चौकशी होईल. त्यात दोषी असणाऱ्यांवर कारवाईही होईल. परंतु सर्वात आधी हे नाट्यगृह पुन्हा उभे राहण्यासाठी राज्य सरकार प्राधान्य दिले जाईल. किती कालावधीत ते उभे राहील हे सांगता येणार नाही, परंतु सर्वांच्या भावनेचा विचार करून युद्धपातळीवर ते पूर्ण करण्याची सरकारची जबाबदारी राहील, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.