लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : ‘गोकुळ’च्या निवडणुकीत आपली आघाडी भक्कम करण्यासाठी एकमेकांना ओढण्यासाठी चढाओढ सुरू आहे. पॅनलमध्ये २१ जागा आहेत आणि नेत्यांची संख्या मात्र २० झाली आहे. कोणाकडे किती मते आहेत, हे पाहूनच पॅनलची बांधणी करावी लागणार आहे. मात्र नेत्यांची गर्दी आणि रुसवे-फुगवे पाहता जागावाटपावरून विरोधी आघाडीची दमछाक होणार हे निश्चित आहे.
सत्तारूढ गटाला शह देण्यासाठी भक्कम आघाडी करण्यासाठी पालकमंत्री सतेज पाटील यांनी राज्यातील महाविकास आघाडीचा फाम्यूर्ला ‘गोकुळ’मध्ये राबविण्याचा प्रयत्न केला. त्यानुसार आमदार पी.एन. पाटीलवगळता सगळे आघाडीच्या झेंड्याखाली एकत्र येऊही लागले. त्यातील अनेकांची इच्छा नसतानाही एकत्र यावे लागल्याने त्यांच्या मतदारसंघात गोची झाली आहे. ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील यांच्यासह या आघाडीत २० नेते आहेत. जागा २१ आणि नेते २० असल्याने पॅनलचा समतोल साधताना सगळ्यांचीच दमछाक होणार आहे. नेत्यांची स्वत:सह वारसदारांना रिंगणात उतरण्याची महत्त्वकांक्षा लपून राहिलेली नाही. त्यात अनेकांनी दोन जागांची मागणी केल्याने आघाडीसमोर पेच निर्माण झाला आहे.
आबीटकरांपाठोपाठ नरकेंचाही दोन जागांचा आग्रह
आमदार विनय कोरे, प्रकाश आबीटकर यांच्यापाठोपाठ आता माजी आमदार चंद्रदीप नरके हे दोन जागांवर आग्रही आहेत. स्वत:चा गट टिकवण्यासाठी त्यांनी चुलत्यांशी संघर्षाची भूमिका घेतली. ‘करवीर’मधील त्याना मानणारे ठराव व विधानसभेचे राजकारण बळकट करण्यासाठी येथे एक जागा मिळावी, यासाठी ते प्रयत्नशील आहेत.
नेते आलेत; पण मते येणार का?
महाविकास आघाडी म्हणून नेते एकत्र आले खरे मात्र त्याचे मतात रूपांतर होणार का? स्थानिक पातळीवरील राजकारण डोके वर काढणार असून, एकमेकांचे उट्टे काढण्याचे प्रकार झाले तर आघाडीसमोर अडचणी निर्माण होऊ शकतात.
‘बचाव’ कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता
‘गोकुळ’ बचाव म्हणून गेली पाच वर्षे संघर्ष केल्यानंतर पॅनलमध्ये आपणाला संधी मिळेल अशी अपेक्षा त्यांची आहे. मात्र प्रचारास लागलेले नेत्यांचे वारसदार व अंतर्गत हालचाली पाहता यातील बहुतांशी जणांना रिंगणाबाहेरच थांबावे लागणार हे जवळपास निश्चित आहे. त्यामुळे त्यांच्यामध्ये अस्वस्थता पसरली आहे.